वृत्तसंस्था/ प्याँगचांग, द.कोरिया
भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई टेटे चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. बुधवारी झालेल्या उपांत्य लढतीत भारतीय संघाला चिनी तैपेई संघाकडून 0-3 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
अचंता शरथ कमल व जी. साथियान या दोन्ही अनुभवी खेळाडूंना अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. त्यांच्यापेक्षा वरचे मानांकन असणाऱ्या तैपेईच्या जोडीकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर हरमीत देसाईने कडवा प्रतिकार केला. चुआंग चिह युआनने शरथ कमलवर 11-6, 11-6, 11-9 तर लिन युन जु याने जी. साथियानवर 11-5, 11-6, 12-10 अशी मात करीत भारतावर 2-0 अशी आघाडी घेतली. आव्हान जिवंत राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या हरमीतने काओ चेंग जुइविरुद्ध एक गेम जिंकून आशा निर्माण केली होती. पण जुइने त्याला 11-6, 11-7, 7-11, 11-9 असे हरवित भारताचे आव्हान संपुष्टात आणले. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झालेल्यांनाही कांस्यपदक दिले जाते.