वृत्तसंस्था/ चांगवॉन
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताचे नवोदित नेमबाज अनीश भनवाला आणि रिदम सांगवान यांनी 25 मीटर रॅपिड फायर मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात कांस्यपदक पटकाविले.
या स्पर्धेमध्ये मंगळवारी झालेल्या 25 मीटर रॅपिड फायर मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात भनवाला आणि सांगवान या जोडीने झेकच्या ऍना डीडोव्हा आणि पॉडेरेस्की यांचा 16-12 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत अनीश आणि रिदम यांचे हे दुसरे पदक आहे. या जोडीने गेल्या मार्चमध्ये कैरो येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर रॅपीड फायर पिस्तुल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते. चांगवॉनमध्ये सुरू असलेल्या या नेमबाजी स्पर्धेत पदकांच्या तक्त्यात भारत सध्या अग्रस्थानावर असून त्यांनी 5 सुवर्ण, 5 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 14 पदकांची कमाई केली आहे.