डब्ल्यूडब्ल्यू रँकिंग सिरीज कुस्ती स्पर्धा : सुमित, नीरज,सुनील कुमार, चीमा, साहिल यांचाही पराभव
वृत्तसंस्था/ बिश्केक, किर्गीजस्तान
भारताच्या मनजीतने येथे सुरू असलेल्या यूडब्ल्यूडब्ल्यू मानांकन सिरीज कुस्ती स्पर्धेत 55 किलो गट ग्रीको रोमन प्रकारात कांस्यपदक पटकावले. युवा महिला मल्ल सोनम मलिक व निशा दाहिया यांना मात्र पहिल्या फेरीतच पराभव स्वीकारावा लागला.
मनजीतला उपांत्यपूर्व फेरीत उझ्बेकच्या इख्तियार बोरिटोव्हकडून 4-13 अशा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पण बोरिटोव्हने अंतिम फेरी गाठल्याने मनजीतला कांस्यपदकाच्या फेरीत खेळण्याची संधी मिळाली. या फेरीत त्याने कझाकच्या येरसिन अबीरवर 14-9 असा विजय मिळवित कांस्य पटकावले. सुवर्णपदकाच्या लढतीत कझाकच्या मार्लन मुकाशेव्हने बोरिटोव्हला हरवून जेतेपद पटकावले.
60 किलो वजन गटात भारताच्या सुमितने रेपेचेज फेरी गाठली होती. पण या फेरीत त्याला कझाकच्या बलबाय डोर्डोकोव्हकडून पराभव पत्करावा लागला. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत तो नुरसुल्तान बझरबाएव्हकडून पराभूत झाला होता. नीरजलाही 67 किलो गटात पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय सुनील कुमार, नरिंदर चीमा व साहिल यांना पात्रता फेरीतच पराभव स्वीकारावा लागला.
सोनम, निशा पराभूत
शुक्रवारी झालेल्या लढतीत सोनम मलिक पात्रता फेरीतच चीनच्या जिया लाँगकडून 3-5 अशा गुणांनी पराभूत झाली तर निशा दाहिया 68 किलो गटात उझ्बेकच्या फिरुझा इसेनबाएव्हाकडून तांत्रिक सरसतेवर पराभूत झाली. फिरुझा नंतर उपांत्यपूर्व फेरीत तुर्कीच्या नेसिर बासकडून पराभूत झाल्याने निशाची रेपेचेज फेरीत खेळण्याची संधी हुकली. 76 किलो गटात प्रियाने युक्रेनच्या अॅनास्तेशिया ओस्नियाचवर 6-0 असा विजय मिळविला. पण उपांत्यपूर्व फेरीत ती चीनच्या कियांदडिजेनचॅगनकडून 1-10 असे एकतर्फी पराभूत झाली.