वृत्तसंस्था/ कराची
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरू असलेल्या शेवटच्या सामन्यातील रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी हॅरी बुकच्या शानदार शतकामुळे इंग्लंडने यजमान पाकवर पहिल्या डावात 50 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे. दिवसअखेर पाकने दुसऱया डावात बिनबाद 21 धावा जमवल्या होत्या.
या मालिकेत इंग्लंडने यापूर्वीच पहिले दोन्ही सामने जिंकून पाकवर विजयी आघाडी मिळवली आहे. आता इंग्लंडचा संघ व्हाईटवॉश करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या शेवटच्या सामन्यात पाकचा पहिला डाव 304 धावावर आटोपला. इंग्लंडने 1 बाद 7 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा डाव 81.4 षटकात 354 धावात आटोपला. इंग्लंडच्या डावात हॅरी ब्रुकचे शतक तसेच पॉप आणि फोक्स यांची अर्धशतके वैशिष्टय़े ठरली. पाकच्या अब्रार अहमद आणि नौमन अली यांनी प्रत्येकी 4 बळी मिळवले.
इंग्लंडच्या डावामध्ये ब्रुकने 150 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारासह 111, फोक्सने 121 चेंडूत 6 चौकारासह 64, पॉपने 64 चेंडूत 4 चौकारासह 51, डकेटने 1 षटकार आणि 1 चौकारासह 26, कर्णधार स्टोक्सने 4 चौकारासह 26, मार्क वूडने 4 चौकारासह 35 आणि ओली रॉबिनसनने 5 चौकारासह 29 धावा जमवल्या. इंग्लंडने पहिल्या डावात महत्त्वपूर्ण 50 धावांची आघाडी मिळवली आहे. त्यानंतर दिवसअखेर पाकने 9 षटकात बिनबाद 21 धावा जमवल्या. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी आहेत. पाकचा संघ अद्याप 29 धावांनी पिछाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक ः पाक प. डाव 304, इंग्लंड प. डाव 81.4 षटकात सर्व बाद 354 (ब्रुक 111, फोक्स 64, पॉप 51, वूड 35, रॉबिनसन 29, स्टोक्स 26, डकेट 26, अब्रार अहमद 4-150, नौमन अली 4-126, वासीम 1-71), पाक दु. डाव 9 षटकात बिनबाद 21 (शफीक खेळत आहे 14, शान मसूद खेळत आहे 3).