कारमधील युवकांनी युवतीला 7 किमीपर्यंत फरफटत नेले ः अत्यंत वेदनादायी मृत्यू 5 आरोपींना अटक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नव्या वर्षाच्या जल्लोषादरम्यान राजधानी दिल्लीतून हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. दिल्लीच्या कंझावला भागात कारमधून प्रवास करणाऱया काही युवकांनी एका युवतीच्या स्कुटीला धडक दिली. या दुर्घटनेनंतर युवक कारमधून पलायन करत असताना युवती कारच्या चाकात अडकून पडली आणि सुमारे 4 किलोमीटर अंतरापर्यंत तसेच फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर युवतीच्या मृतदेहावर कपडय़ाचा एकही तुकडा शिल्लक नव्हता. रक्तबंबाळ युवतीने रस्त्यावरच अखेरचा श्वास घेतला आहे.
शनिवार-रविवारदरम्यान रात्री सुमारे 3 वाजता कंझावला भागात एक युवती निर्वस्त्र अवस्थेत रस्त्यावर पडली असल्याचे पोलिसांना कळविण्यात आले होते. यानंतर त्वरित पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता युवतीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी 5 युवकांना अटक केली असून कारही जप्त करण्यात आल्याची माहिती आउटर दिल्लीचे पोलीस उपायुक्त हरेंद्र सिंह यांनी दिली आहे.
स्कुटीवरून घरी परतत होती युवती
प्रारंभिक तपासानुसार 23 वर्षीय युवती विवाह तसेच अन्य सोहळय़ांमध्ये पार्ट टाइम काम करायची. शनिवारी रात्री ती अशाच एका सोहळय़ातून घरी परतत होती. स्कुटीवरून घरी जात असताना कारसोबत तिचा अपघात झाला होता. या अपघातानंतर युवती कारच्या चाकात अडकून पडली होती. अपघातानंतर युवकांनी तेथे पलायन करण्याच्या हेतूने कार जोरात पळविल्याने युवती रस्त्यावर सुमारे 4 किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. यादरम्यान रस्त्यावर ती तडफडत होती, पोलीस येईपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
आरोपींची वैद्यकीय चाचणी
पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. कारही जप्त करण्यात आली असून आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून याद्वारे त्यांनी मद्यप्राशन केले होते की नाही हे स्पष्ट होणार आहे. तर या घटनेशी निगडित कुठलेच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले नसल्याचे समजते. कारच्या चाकात युवती अडकून पडल्याचे माहित नव्हते असा दावा आरोपींनी चौकशीदरम्यान केला आहे.
सत्य समोर यावे
याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या कंझावला भागात युवतीचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला असून काही युवकांनी मद्याच्या नशेत तिच्या स्कुटीला कारने धडक दिल्याचे आणि तिला अनेक किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत भयानक असून दिल्ली पोलिसांना याप्रकरणी समन्स बजावले आहे. या प्रकरणाचे पूर्ण सत्य समोर यायला हवे असे मालिवाल यांनी म्हटले आहे.