बेळगाव : पुणे, मुंबईनंतर बेळगावच्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे साहजिकच पोलीस दलावर बंदोबस्ताचा ताण असतो. बहुतेक पोलीस अधिकारी नवे आहेत. त्यामुळे त्यांना उत्सवाबरोबरच बेळगावबद्दलची माहितीही समजून घ्यावी लागत आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी कार सोडून बुलेटवरून फेरफटका मारण्यास सुरुवात केली आहे. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी गुरुवारी माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात बुलेटवरून फिरून गणेश मंडळांना भेटी दिल्या. यावेळी माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांना साथ दिली. पोलीस उपायुक्त व पोलीस निरीक्षक हे दोघे वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांना भेटी देण्यासाठी बुलेटवरून फिरले.
या अधिकाऱ्यांसमवेत माळमारुतीचे पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, श्रीशैल गुळगेरी व पोलिसांनीही मोटारसायकलवरून परिसराचा फेरफटका मारला. अंजनेयनगर येथे पुष्पवृष्टी करून पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, तरुण, महिला, मुले यांच्याशी संवाद साधून या अधिकाऱ्यांनी उत्सवासंबंधीची माहिती घेतली. जे. एम. कालीमिर्ची यांनी यापूर्वीही बेळगावात काम करताना अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत. पुन्हा माळमारुती पोलीस स्थानकात त्यांची वर्णी लागली असून बेळगावला येऊन पंधरा दिवसांत त्यांनी पोलीस स्थानकाची साफसफाई केली आहे. आता गणेशोत्सव बंदोबस्तासाठी अधिकाऱ्यांनी बुलेटवरून फिरून गाठीभेटींवर भर दिला आहे.