न्यू गांधीनगर येथील भवनमध्ये आयोजन : समाजातील मुलांना विविध सुविधा पुरविणार
प्रतिनिधी /बेळगाव
बंटर (नाडवर) संघाचा 38 वा वर्धापन दिन रविवारी न्यू गांधीनगर येथील बंटर भवनमध्ये उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल बेनके होते. प्रमुख पाहुणे म्हणून उडुपी जिल्हा हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. तल्लूर शिवराम शेट्टी, कर्नाटक प्रदेश हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष जी. के. शेट्टी, संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेट्टी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व परिचय ऍड. प्रभाकर शेट्टी यांनी केले. यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर शेट्टी म्हणाले, शहरात बंटर समाजाचे लोक अधिक प्रमाणात आहेत. समाजाचा विकास साधण्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. समाजाच्या बंटर भवनाचादेखील विकास साधून नूतनीकरण केले जाणार आहे. या ठिकाणी सुसज्ज मंगल कार्यालय, पार्किंग, स्टेज, शौचालय आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
याबरोबर संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पूजा, स्पर्धा, खेळ, गणपती, गणहोम व धार्मिक कार्यक्रम केले जातात. विठ्ठल हेगडे यांनी संघाचे अध्यक्ष म्हणून 25 वर्षे कार्यभार सांभाळला आहे. याबरोबरच भविष्यात एज्युकेशन ट्रस्टची स्थापना करून समाजातील मुलांना शिक्षणाची सुविधा पुरविली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष बाळकृष्ण शेट्टी, सचिव चेतन शेट्टी, खजिनदार प्रताप शेट्टी यासह समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. प्रारंभी स्वागतगीत स्वाती शेट्टी हिने सादर केले. सूत्रसंचालन शशिधर शेट्टी यांनी केले. तर प्रताप शेट्टी यांनी आभार मानले.