जिल्ह्यात 28 हजारांहून अधिक घरांची कामे अर्धवट : निधीच्या अभावामुळे कामांचा खेळखंडोबा
बेळगाव : मागील पाच ते सहा वर्षांपासून अनेक वसती योजनांची कामे अर्धवट राहिली आहेत. याला अनेक कारणे आहेत. एक तर सरकारकडून योग्यवेळेत निधी मिळत नाही, कामे करण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष, मंजुरी मिळाली नाही यासह अनेक कारणांनी जिल्ह्यातील 28 हजारांहून अधिक घरांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे ही कामे पूर्ण तर कधी होणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील विविध वसती योजनेंतर्गत अनेक घरांची कामे रेंगाळली आहेत. विविध वसती योजनेंतर्गत मागील पाच ते सहा वर्षांत 30 हजारांहून अधिक घरे मंजूर झाली आहेत. त्यामधील मोजक्याच घरांची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष करुन वेगवेगळ्या योजनेतून एकाच व्यक्तीला दोन ते तीन घरे मंजूर झाल्याचा प्रकार घडत आहे. मात्र ती बांधून घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष करुन ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील राजकारणांमुळे अनेक इच्छुकांना याचा लाभ घेता आला नाही. अनेकजण इच्छुक असूनही त्यांचे अर्ज मात्र धूळखात पडत आहेत. विकासावर भर देतो, असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींना जर खरच विकास साधायचा असेल तर इच्छुकांना घरे मंजूर करण्याची गरज आहे. खऱ्या लाभार्थ्यांना डावलून नको त्यांना ही घरे मंजूर करण्यात आल्याचा फटकाही या योजनांना बसला आहे.
संबंधित ग्राम पंचायतींना ही घरे वाटप करण्यात येतात. यामुळे संबंधित ग्राम पंचायतीत ज्या आमदाराची सत्ता आहे, त्यांच्या समर्थकांनाच वसती योजनेतून घरे मंजूर करण्याची प्रथाच निर्माण झाली आहे, असे अनेकांतून बोलले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटल बिहारी वाजपेयी, बसव वसती योजना, पंतप्रधान आवास योजना यासह अनेक योजनांतून घरे मंजूर करण्यात आली आहेत. याबाबत संबंधित ग्राम पंचायतींनी अनेकांना अनभिज्ञच ठेवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे योजनांचा लाभ आणि कर्मचाऱ्यांना ताप, अशीच अवस्था सध्या निर्माण झाली आहे. मंजूर झालेल्या घरांना 1 लाख 50 हजार ऊपये मिळत आहेत. यामुळे अनेकांना आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निधीचा अभाव असतो. यामुळे अनेकांना पैशांमुळे मंजूर झालेली घरे अर्धवट ठेवावी लागतात. यामधील अनेक घरांसाठी अर्जच आले आहेत. मात्र जुनीच घरे पूर्ण न झाल्याने नवीन अर्ज धूळखात पडले आहेत. अद्यापही अनेक घरांचे काम अर्धवट स्थितीत आहे. तर अनेकांनी मंजूर झालेली घरे बांधूनच घेतली नाहीत. यामुळे कोट्यावधी ऊपयांचा निधी वापस गेला आहे. दरवर्षी अनेक घरे मंजूर होतात. मात्र ग्राम पंचायतीकडून त्याचे योग्य नियोजन नसल्याने कोट्यावधीचा निधी वापस जातो. यासाठी अनेकांनी मंजूर झालेल्या घरांचे काम लवकरात लवकर पूर्ण कऊन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
माहिती जमा करण्यातच फुटतो घाम
बेळगाव जिल्ह्यात 500 हून अधिक ग्राम पंचायती आहेत. प्रत्येक ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोणत्या योजनेतील घरांची कामे कुठपर्यंत आली आहेत? याची माहिती जमा करण्यातच अधिकाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. घरांचे काम व दिलेल्या अर्जांची छाननी कऊन त्याची माहिती संबंधित विभागाला आणून देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना तापदायक ठरत आहे. दररोज 57 ग्राम पंचायतींना फोनद्वारे संपर्क साधून माहिती घ्यावी लागते. याचबरोबर जीपीएस व इतर ऑनलाईन माहिती पाठविणे, सर्व्हर डाऊनचा फटका या साऱ्या समस्यांमुळे तालुका पंचायतीमधील अधिकाऱ्यांना घाम येत असतो. त्यामुळे यापुढे तरी हा प्रकार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार
जिल्ह्यातील अनेक घरांची कामे अर्धवट आहेत. ती कामे पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही याकडे नागरिकांनी म्हणावे तसे लक्ष दिले नाही. यातच अनुदान मिळत नसल्यानेही समस्या निर्माण होत आहेत. घरांच्या बांधकाम व इतर अडचणेंमुळे या समस्या येत असल्या तरी आपण तातडीने ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
– जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर