कडीकोयंडा तोडून 5 लाखांचा ऐवज लांबविला : परिसरात खळबळ
प्रतिनिधी /बेळगाव
आझाद गल्ली येथील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून सुमारे 5 लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. बुधवारी दुपारी 12 ते 1 यावेळेत भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
यासंबंधी हरिष प्रजापत यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. हरिष नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी आपल्या दुकानाला गेले होते. पत्नी बाजारात गेली होती. दुपारी 1 वाजता घरी परतली. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला आहे. तिजोरी फोडून 5 तोळे सोन्याचे दागिने, 2 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे 5 लाखांचा ऐवज पळविला आहे. घटनेची माहिती समजताच मार्केटचे प्रभारी पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून शहर व उपनगरांत चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू झाले आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील मच्छे, पिरनवाडी व हिंडलगा येथे सलग तीन दिवस तीन घरफोड्या झाल्या आहेत. आता शहराच्या मध्यवर्ती भागातही चोरीची घटना घडली आहे. मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.