प्रतिनिधी/लांजा
तालुक्यातील वेरवली बुद्रुक वरचीवाडी येथे घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे पावणे दोन लाखांची चोरी झाल्याची घटना ७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद सुजाता शरद आंबर्डेकर (५९, वेरवली बु. वरचीवाडी, लांजा) यांनी पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता आंबर्डेकर या १५ दिवस बाहेर गावी गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरटयांनी खिडकीचे गज कापून आणि कौले काढून घरात प्रवेश केला. घरातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची माळ, ३ हजार रुपये किंमतीची नाकातील चमकी, १५ हजार रुपये किंमतीची सोन्याची लेडीज अंगठी, १२ हजारांचे सोन्याचे कानातील रिंग, १५ हजार रुपयांची कुडी, ५० हजार रुपये रोख रक्कम, तांब्याचे ताम्हण, पितळेचे ताट, दोन तांब्याच्या कळशा, २ तांब्याचे तपेले, हंडा, पितळेचे पातेले, बँक ऑफ इंडियाच्या आंबर्डेकर यांच्या नावावर असलेल्या १२ मुदत ठेवीची प्रमाणपत्र असा एकूण १ लाख ७६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
हे ही वाचा : अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्याला २० वर्षे कारावास
आंबर्डेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास लांजा पोलीस आहेत.