एक्स्पे्रस बेळगावपर्यंतच धावत असल्याने बसची सोय : हेल्पडेस्कवर प्रवाशांना अधिक माहिती उपलब्ध
बेळगाव : नैत्य रेल्वेने बेळगाव-मिरज मार्गावर ऐन गणेशोत्सवात मेगा ब्लॉक केल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. प्रवास करण्यासाठी अनारक्षित एक्स्प्रेस उपलब्ध नसल्यामुळे तासन्तास थांबून पुढील एक्स्प्रेस येईपर्यंत वाट पहावी लागत आहे. पुढील चार दिवस असाच मनस्ताप सहन करावा लागणार आहे. गणेशोत्सवाचा कालावधी सोडून इतर दुरुस्तीचे काम केले असते तर चालले नसते का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. नैत्य रेल्वेने 22 ते 26 सप्टेंबर दरम्यान बेळगाव-मिरज या मार्गावरील अनेक अनारक्षित एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावत असून तेथून पुढे रद्द करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर, मिरज, सांगली येथील प्रवाशांना बेळगावपर्यंत बसने येऊन तेथून रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे. काही एक्स्प्रेस उशिराने धावत आहेत तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
रेल्वेस्थानक प्रवेशद्वारावर हेल्पडेस्क
तिरुपती एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावत असल्याने बेळगावहून कोल्हापूरपर्यंत पोहोचण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली. शुक्रवारी परिवहन मंडळाच्या आठ बस रेल्वेस्थानक परिसरातून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी हेल्पडेस्क सुरू केला आहे. या ठिकाणी प्रवाशांना पुढील प्रवासाची सविस्तर माहिती दिली जात आहे.