बेळगाव : यंदा शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ग्राम वन आणि कर्नाटक वनमध्ये बसपास उपलब्ध करून दिला जाणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना सेवासिंधू पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ही सर्व सुविधा ग्राम वन आणि कर्नाटक वनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हेलपाटे थांबणार आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातीलच ग्राम वनमध्ये बसपास उपलब्ध होणार आहेत. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास वितरण प्रक्रियेला सुरुवात होते. मात्र मागील दोन वर्षांत बसपास वितरण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते. त्यामुळे बसपास प्रक्रियेचे कामदेखील सुरळीत झाले नव्हते. मात्र यंदा 29 मेपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसपास आवश्यक आहे.
येत्या 3 जूनपासून बसपास वितरण प्रक्रियेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस विद्यार्थ्यांना तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. बेळगाव विभागातून दरवर्षी 76 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास काढतात. मात्र मागील दोन वर्षांत हा आकडा घटला आहे. मात्र यंदा पुन्हा बसपास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणार आहे. बसपास प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बसस्थानकात विद्यार्थ्यांची झुंबड उडत होती. मात्र यंदा ग्राम वन व कर्नाटक वनमध्ये ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नाहक त्रासदेखील थांबणार आहे. विशेषत: ग्रामीण, दुर्गम आणि डोंगरभागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धत सोयीस्कर ठरणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना बसपाससाठी हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता जवळच्या ग्राम वनमध्ये बसपास प्रक्रिया चालणार असल्याने गावातच बसपास उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रथमत: जवळच्या ग्राम वन किंवा कर्नाटक वनमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर हे ऑनलाईन अर्ज बसपास विभागाकडे जाणार आहेत. तेथून बसपास तयार करून कर्नाटक वन आणि ग्राम वनमध्ये ऑनलाईन पाठविले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हातात बसपास उपलब्ध होणार आहे.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बसपास घ्या
यंदा ग्राम वन व कर्नाटक वनमध्ये ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून या प्रक्रियेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बसपास काढून घ्यावेत.
– ए. वाय. शिरगुप्पीकर (डेपो मॅनेजर)