मुंबई, पुणे, कोल्हापूर बसेस सुसाट
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्रात बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सीमाहद्दीतील प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनामुळे तात्पुरती ही बससेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, प्रवाशांच्या सोयीखातर पुन्हा बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आंदोलनामुळे कर्नाटकच्या बसेस केवळ सीमाहद्दीपर्यंत सुरू होत्या. खबरदारी म्हणून परिवहनने काही काळ बससेवा बंद केली होती. मात्र, अद्याप आंदोलन सुरूच असले तरी कर्नाटकातून महाराष्ट्रात धावणाऱ्या बसेस पूर्ववत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात वातावरण तापले आहे. विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान काही वाहनांवरदेखील दगडफेक होऊ लागली आहे. दरम्यान खबरदारी म्हणून बेळगाव परिवहन विभागाने महाराष्ट्रात धावणाऱ्या बसेस काही काळाकरिता थांबवल्या होत्या. मात्र रविवारपासून त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई यासह सावतंवाडी, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कुडाळ आदी ठिकाणी बससेवा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊ लागली आहे.