वीज खांबाला धडक देत, पाच दुचाक्या चिरडल्या
प्रतिनिधी /शिरोडा
धावत्या मिनीबसने शिरोडय़ातील भर बाजारात वीज खांबाला धडक देत रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या काही दुचाक्या उडविल्या. मंगळवारी सांयकाळी 5.45 वा. सुमारास हा थरार घडला. त्यात दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले तरी, सुदैवाने मोठी जिवित हानी टळली. मात्र बसखाली सापडलेल्या पाच दुचाक्यांची बरीच हानी झाली आहे. जीए 04 टी 4289 या क्रमांकाची ही प्रवासी बस फोंडय़ाहून सावर्डेकडे जात होती.
शिरोडा बसस्थानकावर थांबा घेऊन ही बस सावर्डेकडे निघाली होती. बाजारातील जंक्शनवर वळण घेताना चालकाचा बसवरील ताबा सुटला व बाजूच्या वीज खांबाला बसने जोरदार धडक देत तो आडवा पाडला. यावेळी बाजूला पार्क केलेल्या पाच दुचाक्या बसखाली सापडल्याने त्यांचा चुराडा झाला. नंतर ही बस बाजूच्या भिंतीवर जाऊन आदळली. यावेळी बसमध्ये काही प्रवासी होते. त्यापैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली. विशेष म्हणजे सायंकाळच्यावेळी शिरोडा बाजारात लोकांची गर्दी असते. या घटनेच्यावेळी आसपास कुणीही नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वीज खांब कोलमडून पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.