सभांसह इतर कामांसाठीही बसेस बुकिंग होणार
बेळगाव : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने परिवहनच्या बसना मागणी वाढली आहे. निवडणूक साहित्य, सभा आणि इतर कामांसाठी बस बुकिंग केल्या जात आहेत. त्यामुळे निवडणुकीचा काळ परिवहनसाठी अच्छे दिन ठरणार आहे. विविध मार्गांवर जादा बस धावणार असल्याने महसुलात वाढ होणार आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक परिवहनसाठी उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची ठरणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून सभा, निवडणुकीचे साहित्य आणि इतर कामासाठी बस बुकिंग केल्या जात आहेत. शिवाय निवडणूक आयोगाकडून बस बुकिंग केल्या गेल्या आहेत. परिवहनकडून 57 रुपये प्रति किलोमीटर भाडे आकारणी केली जात आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशा राजकीय सभा, जाहीर सभा व शक्तिप्रदर्शनालाही वेग येणार आहे. दरम्यान पोलीस बंदोबस्तासाठीही परिवहन बसना पसंती दिली जाते. त्यामुळे पोलीस खात्याकडूनही काही बसेस बुक केल्या जात आहेत. उमेदवारांकडून जाहीर सभांचे आयोजन केले जाते. दरम्यान सभेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मतदारांना वाहनांची गरज असते. अशावेळी खासगी वाहने आणि परिवहन मंडळच्या बस बुक केल्या जातात. शिवाय विविध भागांतून मतदारांना आणून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ लागते. शिवाय इतर ठिकाणीही पोलीस दाखल होणार आहेत. या सर्व कामांसाठी परिवहन मंडळाच्या बसना पसंती दिली जाणार आहे. निवडणुकीमुळे केंद्रीय पथकासह विविध खात्यांचे कर्मचारी एव्हीएम, व्हीव्हीपॅड या यंत्रांसह विविध साहित्य केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी परिवहन मंडळाच्या बस धावणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
निवडणूक काळात सार्वजनिक वाहतूक विस्कळीत?
निवडणुकीच्या काळात विविध कामांसाठी परिवहनच्या बस बुक केल्या जाणार आहेत. त्यामुळे दैनंदिन सार्वजनिक वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे. काही गावच्या बसेस ठप्प केल्या जाणार आहेत. आधीच बसचालक आणि वाहकांची कमतरता असल्याने बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यातच निवडणुकीसाठी काही बस बुक केल्याने अडचणी वाढल्या आहेत.
दैनंदिन वाहतुकीत कोणतीही अडचण येणार नाही
निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून आणि निवडणूक आयोगाकडून बसेस बुक केल्या जात आहेत. मात्र दैनंदिन वाहतुकीत कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
-के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)