नावगे क्रॉस ते किणये पुलापर्यंतचा रस्ता बनला धोकादायक : अपघाताच्या घटनांमध्ये वाढ : प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : वाहनधारकांतून तीव्र संताप
वार्ताहर /किणये
नावगे क्रॉस ते किणये मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डय़ांमुळे अनेक अपघातांच्या घटनाही घडलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. बेळगाव-चोर्ला मार्गावरील नावगे क्रॉस ते किणये गावाजवळील पुलापर्यंतचा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्यावर असलेल्या खड्डय़ांमुळे आठ दिवसातून किमान दोन ते तीन अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याच्या अधिकाऱयांना अनेक वेळा सांगूनही या रस्त्याकडे कानाडोळा केला जात आहे. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे, असा सवालही सर्वसामान्य जनता विचारत आहेत.
किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, बेळवट्टी, रणकुंडये, नावगे, संतिबस्तवाड या परिसरातील वाहनधारकांची या रस्त्यावर रोज मोठय़ा संख्येने वर्दळ असते तसेच या रस्त्यावरून वाहनधारक गोव्याला मोठय़ा संख्येने जातात. मात्र खड्डय़ांमुळे वाहनधारक अक्षरशा वैतागून गेले आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी किणये ते पिरनवाडीपर्यंत काही ठिकाणी रस्त्याचे पॅचवर्क करण्यात आले. मात्र हे कामकाज सुरळीत करण्यात आले नसल्याच्या तक्रारी वाहनधारक करीत आहेत. कारण रस्त्याच्या मधेमध बऱयाच ठिकाणी खड्डे असूनही ते बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी वाहनधारकांना खड्डय़ांच्या रस्त्यातूनच प्रवास करावा लागतो आहे. ग्रामीण भागातील बऱयाच ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे मात्र किणये गावच्या या मुख्य रस्त्याकडेच प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे, अशी चर्चाही या भागात सध्या सुरू आहे. सदर रस्त्यावरून गोव्याला ये-जा करणाऱया वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. ही वाहने सुसाट वेगाने धावतात. त्यामुळे या वाहनधारकांच्या वेगावर नियंत्रण आणणेही गरजेचे असल्याची माहिती स्थानिक शेतकऱयांनी दिली आहे.
आठ दिवसात दुरुती न केल्यास रास्तारोको
रणकुंडये क्रॉसजवळ भलामोठा धोकादायक खड्डा पडलेला आहे. या खड्डय़ाच्या दुरुस्तीकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. संबंधित लोकप्रतिनिधी जर या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर आम्ही येत्या आठ दिवसात रणकुंडये क्रॉसजवळ रास्तारोको करू. शनिवारीच सायंकाळी रणकुंडये क्रॉसजवळ कार व दुचकीचा अपघात सदर खड्डय़ामुळे झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली. पण मोठा अनर्थ घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का?
– मंगेश पाटील, रणकुंडये
पाहणी करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी
रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वाहतूक करणे डोकेदुखीचे बनले आहे. काही महिन्यापूर्वी रस्त्याचे पॅचवर्क करण्यात आले होते. वास्तविक त्याचवेळी सदर कंत्राटदाराने योग्य पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक होते. खड्डय़ांमुळे रात्रीच्या वेळी अधिक अपघात घडू लागले आहेत. तसेच किणये पुलाजवळ भला मोठा खड्डा पडलेला आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.
– शेखर पाटील, बहादरवाडी.