प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे येथील पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या दयानंद कला केद्राच्या ‘सुवर्ण कीर्ती उत्सव’ या दिवसभराच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गोव्यातील तीन ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा 3 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजता रवींद्र भवन कुडचडे येथे आयोजित केला असून त्यात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुर्डीकर, राजू भिकारो नाईक व लक्ष्मण मडगावकर यांचा समावेश आहे.
दयानंद कला केंद्राचे अध्यक्ष मोर्तू नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत या पत्रकारांनी संस्थेला विविध विषयांसंदर्भात मौलिक मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर संस्थेचे कार्य गोव्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकारितेच्या माध्यमांतून केले आहे. दयानंद कला केंद्राची कीती वाढण्यास त्यांचेही सहकार्य लाभले आहे, याची दखल घेऊन हा त्यांचा सन्मान करण्यात येत आहे, असेही नाईक यांनी सांगितले.