बेळगाव प्रतिनिधी : आठवडी बाजारात जोंधळे विकण्यासाठी चलवेनट्टी (ता. बेळगाव) हून आलेल्या एका शेतकरी महिलेचे लक्ष विचलित करून तिच्या अंगावरील दागिने पळविण्यात आले आहेत. शनिवारी दुपारी आझाद गल्ली येथे हि घटना घडली असून सीसीटीव्ही फुटेजवरून भामट्यांचा शोध घेण्यात येत आहे. लक्ष्मी सिद्धाप्पा पाटील (वय 50, रा. चलवेनहट्टी) या महिलेच्या अंगावरील दोन तोळय़ाचे मंगळसूत्र व कर्णफुले असे दागिने भामट्यांनी पळविले आहेत. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर पुढील तपास करीत आहेत. लक्ष्मी या शनिवारी आठवडी बाजारानिमित्त जोंधळे विकण्यासाठी बेळगावला आल्या होत्या. काकतीवेसवर दोघा भामट्यांनी त्यांना गाठले. त्यानंतर लक्ष्मी यांनी विक्रीसाठी आणलेले जोंधळे विकल्यानंतर उरलेले जोंधळे विकण्यासाठी त्या पुढे पांगुळ गल्लीमार्गे आझाद गल्लीकडे निघाल्या. तेव्हा त्यांच्यासोबत भामटेहि गेले. वाटेत त्यांनी लक्ष्मी यांना विश्वासात घेत आम्हीहि तुमच्यासारखेच दागिने करून घेणार आहोत, असे सांगितले.
पुढे भामट्यांनी लक्ष्मी यांना दागिने काढून दाखवण्यास सांगितले. ते बघून झाल्यानंतर ‘आजकाल दिवस वाईट आहेत. कोणी तरी ते दागिने पळवतील, हे अंगावर घालू नका, आम्ही रुमालात बांधून देतो, तुमच्याजवळ ठेवून घ्या’, असे सांगत दागिने रुमालात बांधून दिल्याचे नाटक केले. भामटे तेथून निघून गेल्यानंतर थोडय़ा वेळाने लक्ष्मी यांनी रुमालाची गाठ सोडली. त्यावेळी त्याच्यात दागिने नव्हते, वाळू होती. त्यामुळे आपण फसलो गेलो हे त्यांच्या लक्षात आले. भामट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Previous Articleकाँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी?, प्रस्ताव मंजूर
Next Article दुर्गादेवीच्या मूर्तींना चढू लागला रंग