माणिक साहा यांच्या राजीनाम्याने रिक्त जागा
वृत्तसंस्था/ अगरतळा
भाजप नेते माणिक साहा यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री झाल्यावर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेकरता 22 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने बुधवारी दिली आहे. साहा यांनी 4 जुलै रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वरिष्ठ सभागृहात त्यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2028 मध्ये समाप्त होणार होता. निवडणूक आयोगानुसार पोटनिवडणुकीची अधिसूचना 5 सप्टेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे. मतदान समाप्त झाल्याच्या एका तासात 22 सप्टेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या जागेकरता होणाऱया पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी होण्याची दाट शक्यता आहे.