सर्व मंत्र्यांचा राजीनामा, आज नवीन मंत्रिमंडळ घेणार शपथ
भुवनेश्वर / वृत्तसंस्था
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओडिशातील सर्व मंत्र्यांनी शनिवारी राजीनामा दिला. आता नवीन मंत्रिमंडळ 5 जून रोजी शपथ घेणार आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करायचा असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नवीन मंत्री रविवारी दुपारी 12 वाजता शपथ घेतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. नव्या मंत्र्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सरकारच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांकडून राजीनामे मागवले होते. सरकार सर्व मंत्र्यांना हटवून नव्या मंत्र्यांना पदभार देणार असल्याचे बोलले जात आहे. ओडिशातील राजभवनात रविवारी सर्वजण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यात 2024 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि पटनायक आपल्या नव्या टीमसोबत निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.
2019 मध्ये ओडिशामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवीन पटनायक यांच्या पक्षाला बंपर बहुमत मिळाले होते. त्यांनी राज्यातील एकूण 146 जागांपैकी 113 जागा जिंकल्या. याशिवाय भाजपने 23, काँग्रेसने 9 आणि एक जागा डाव्या पक्षांना प्राप्त झाली होती. तर एक जागा अपक्ष उमेदवाराच्या खात्यात गेली. ओडिशात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमताचा आकडा 74 आहे. या अर्थाने नवीन पटनायक यांना पूर्ण बहुमत मिळाले होते.
सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदाच्या यादीत तिसरे
नवीन पटनायक यांच्या नावावर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱयांच्या यादीत तिसऱया क्रमांकावर राहण्याचा विक्रम आहे. 2000 मध्ये पहिल्यांदा नवीन यांच्या नेतृत्वाखाली बिजू जनता दलाचे सरकार स्थापन झाले. त्यापासून राज्यात त्यांचा जलवा सुरू आहे. 2014 आणि 2019 च्या मोदी लाटेतही नवीन पटनायक यांनी ओडिशात प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली. बीजेडीने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 44.7 टक्के मतांसह 113 जागा जिंकल्या. त्याच वेळी, 2014 च्या निवडणुकीतही पटनायक यांनी 43.7 टक्के मतांसह 117 जागा जिंकल्या होत्या. देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम सिक्कीमच्या पवन कुमार चामलिंग (24 वर्षे) यांच्या नावावर आहे. दुसऱया क्रमांकावर पश्चिम बंगालचे ज्योती बसू आहेत, ज्यांनी 1977 ते 2000 पर्यंत 23 वर्षे बंगालची सत्ता सांभाळली. नवीन पटनायक या यादीत तिसऱया क्रमांकावर आहेत. आतापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून 22 वर्षे पूर्ण केली आहेत.
पोटनिवडणुकीतही बीजेडीची बाजी
बीजेडीने या आठवडय़ात ओडिशातील एका जागेवर पोटनिवडणूक जिंकली होती. डिसेंबर 2021 मध्ये बीजेडी आमदार किशोर मोहंती यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्याची गरज होती. पक्षाने किशोर मोहंती यांच्या पत्नीला पोटनिवडणुकीत उतरवले होते.