आज बैठकीनंतर होणार अधिकृत घोषणा : आंदोलन तीव्र करण्याचा पुढाकार
प्रतिनिधी/ बेंगळूर
कठीण परिस्थितीत तामिळनाडूला कावेरीचे पाणी सोडण्याला विरोध दर्शवून आंदोलन तीव्र करण्याचा पुढाकार घेतलेल्या संघटनांनी 29 सप्टेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. तामिळनाडूला कावेरीचे पाणी सोडण्याला विरोध करून काही संघटनांनी रविवारी बेंगळुरात आंदोलन छेडले. कावेरी प्रश्नावर राज्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी 29 तारखेला कर्नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सोमवारी कन्नड संघटना आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांची बैठक घेऊन कर्नाटक बंदची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
कोणत्याही कारणास्तव कावेरीचे पाणी तामिळनाडूला सोडू नये, यासाठी बेंगळूरच्या म्हैसूर बँक सर्कलमध्ये विविध कन्नड संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. राज्यातील सर्व खासदारांनी तात्काळ राजीनामा द्यावा. कावेरी प्रश्नात राज्यावर अन्याय होत असल्याने विधिमंडळाचे तातडीचे अधिवेशन तातडीने बोलावण्यात यावे, अशी मागणीही सदर संघटनांनी यावेळी केली.
तामिळनाडूला सोडण्यात येणारे कावेरीचे पाणी थांबवावे, अशी मागणी करत संघटनांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रास्तारोकोचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
उद्याच्या बेंगळूर बंदला भाजपचा पाठिंबा
तामिळनाडूला कावेरीचे पाणी सोडण्यासंबंधी दिलेल्या आदेशाच्या निषेधार्थ विविध संघटनांनी मंगळवारी ‘बेंगळूर बंद’ची हाक दिली आहे. या बंदला भाजपचा पाठिंबा असेल, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली. बेंगळुरात पत्रकारांशी ते बोलत होते. शेतकरी संघटनांनी 26 रोजी पुकारलेल्या बेंगळूर बंदला आपला पाठिंबा राहील. याला आम्ही विरोध दर्शविणार नाही, असेही ते म्हणाले.