दहशतवादी पन्नूची धमकी : दोन व्हिडिओ केले जारी
वृत्तसंस्था/ ओटावा
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा या देशांमध्ये तणाव आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या मुत्सद्याची हकालपट्टी केली आहे. याचदरम्यान शिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंन सिंह पन्नूने 2 नवे व्हिडिओ जारी केले आहेत. हिंदूंचा देश भारत असून त्यांनी कॅनडा सोडून भारतात परत जावे. कॅनडात केवळ खलिस्तान समर्थक शिखच राहतील असे त्याने पहिल्या व्हिडिओत म्हटले आहे.
दुसऱ्या व्हिडिओत खलिस्तानी दहशतवाद्याने 25 सप्टेंबर रोजी व्हँकुव्हर, ओटावा आणि टोरंटोमधील भारतीय दूतावास बंद करविण्याची धमकी दिली आहे. याचबरोबर त्याने डेथ ऑफ इंडिया मोहीम सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. खलिस्तानी दहशतवाद्याने जाहीरपणे धमकी दिल्यावर भारत सरकारने कॅनडात राहत असलेल्या भारतीयांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांकडून कॅनडातील भारतीयांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. कॅनडात शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना अधिक सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. भारतीय समुदाय तसेच विद्यार्थ्यांना दूतावासाच्या वेबसाइटवर स्वत:ची तक्रार नोंदविता येणार आहे.
कॅनडाची भूमी खलिस्तानींसाठी
कॅनडाची भूमी केवळ खलिस्तानींसाठी आहे. खलिस्तानी कॅनडासोबत सदैव उभे आहेत. खलिस्तानी कॅनडाच्या राज्यघटनेला मानतात. कॅनडाच्या घटनेनुसार देखील हिंदू येथे राहू शकत नाहीत. भारत हा हिंदूंचा देश आहे. हिंदूंना कॅनडात राहण्यासाठी स्वत:चा धर्म बदलावा लागणार असल्याची गरळ दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने ओकली आहे. गुरपतवंत सिंह हा भारतासाठी मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. भारत आणि कॅनडा यांच्यात निज्जरच्या हत्येवरून तणाव निर्माण झाला असताना त्याने हे व्हिडिओ जारी केले आहेत.
भारतीय दूतावासांना लक्ष्य करण्याची धमकी
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने विदेशातील भारतीय दूतावासांना टेरर हाउस संबोधिले ओह. विदेशातील भारतीय दूतावासांमध्ये दररोज शिखांना कसे मारायचे याचे प्लॅनिंग होत असते. यानंतर विदेशात राहत असलेल्या शिखांची हत्या घडवून आणली जात आहे. विदेशातील भारताचे टेरर हाउस बंद करविण्यात येतील असे प्रक्षोभक वक्तव्य दहशतवादी पन्नूने केले आहे.
29 ऑक्टोबरला पुन्हा जनमत चाचणी
खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने कॅनडात मारले गेलेला दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येसाठी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याला दोषी ठरविले आहे. किल इंडिया मूव्हमेंट अंतर्गत कॅनडाच्या सरीमध्ये 29 ऑक्टोबर रोजी पुन्हा जनमत चाचणी करविण्यात येईल आणि भारतीय अधिकाऱ्याच्या विरोधात मतदान करविण्यात येईल अशी घोषणा दहशतवादी पन्नूने केली आहे.