पंतप्रधान ट्रुडोंकडून पुराव्यांशिवाय आरोप : श्रीलंकेबद्दल केले होते खोटे वक्तव्य
वृत्तसंस्था/ कोलंबो
भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेल्या राजनयिक तणावादरम्यान श्रीलंकेने स्वत:ची भूमिका मांडली आहे. कॅनडा दहशतवाद्यांना आश्रय पुरवत आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो कुठल्याही पुराव्यांशिवाय भारताविरोधात आरोप करत असल्याची टीका श्रीलंकेचे विदेशमंत्री अली साबरी यांनी केली आहे.
ट्रुडो यांनी यापूर्वीच असे निरर्थक आरोप यापूर्वी केले असल्याने आम्ही भारताच्या विरोधातील आरोप पाहून चकित झालो नाही. ट्रुडो यांनी यापूर्वी श्रीलंकेबद्दल असेच खोटे वक्तव्य केले होते. श्रीलंकेत नरसंहार झाल्याचे ट्रुडो यांनी म्हटले होते, परंतु प्रत्यक्षात असे काहीच घडले नव्हते आणि हे सगळ्यांनाच ठाऊक असल्याचे साबरी म्हणाले.
दुसऱ्या महायुद्धातील नाझींच्या बाजूने लढणाऱ्या व्यक्तीचा कॅनडात कसा गौरव करण्यात आला हे आम्ही पाहिले आहे. पंतप्रधान ट्रुडो अनेकदा अपमानापस्द आरोपांसोबत समोर येतात, या आरोपांना कुठलाच आधार नसतो असे साबरी यांनी म्हटले आहे.
ट्रुडो यांचा आरोप
पंतप्रधान ट्रुडो यांनी मे महिन्यात श्रीलंकेतील गृहयुद्ध संपुष्टात येण्याच्या घटनेला 14 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त टिप्पणी केली होती. गृहयुद्धादरम्यान हजारो तमिळांनी जीव गमावला होता, अनेक जण बेपत्ता आहेत. तसेच कित्येकांना स्वत:चे घर सोडावे लागले. यातही मुलिवाइकलमध्ये झालेला नरसंहारही सामील असल्याचे ट्रुडो यांनी म्हटले होते. कॅनडाच्या संसदेने सर्वसंमतीने 18 मे या दिवशी तमिळ नरसंहार स्मृती दिन घोषित करण्याचा प्रस्ताव संमत केला होता. या निर्णयाला श्रीलंकेने विरोध दर्शविला होता.
अपमानास्पद वक्तव्य
ट्रुडो यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही देशांचे संबंध प्रभावित झाल्याचे साबरी यांनी निदर्शनास आणून दिले आहे. कुणीही अन्य देशांच्या विषयांमध्ये हस्तक्षेप करू नये. तसेच देश कसा चालविण्यात यावा हे सांगण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही आमच्या देशात असल्याने येथील स्थिती अधिक चांगल्याप्रकारे जाणतो. ट्रुडो यांचे वक्व्य हे चुकीचे आणि अपमानास्पद होते असे साबरी यांनी म्हटले आहे.
आम्ही भारतासोबत
कॅनडाच्या आरोपांप्रकरणी भारताची प्रतिक्रिया अत्यंत कठोर राहिली आहे. श्रीलंका याप्रकरणी भारताचे समर्थन करत आहे. श्रीलंकेच्या लोकांनी दहशतवादाला तोंड दिले आहे. आमचा देश दहशतवादाबद्दल झिरो टॉलरन्सचे धोरण बाळगून असल्याचे उद्गार भारतातील श्रीलंकेचे राजदूत मिलिंडा मोरागोडा यांनी काढले आहेत.
चौकशीत सहकार्य करावे
अमेरिकेने पुन्हा एकदा खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणीचा चौकशीचा पुनरुच्चार केला आहे. आम्ही ट्रुडो यांच्या आरोपांमुळे चिंतेत आहोत. कॅनेडियन सहकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. ही महत्त्वपूर्ण घटना असल्याचे आमचे मानणे आहे. कॅनडाने चौकशी पुढे नेत गुन्हेगारांना शिक्षा मिळवून द्यावी. आम्ही भारत सरकारला कॅनेडियन चौकशीत सहकार्य करण्याचे आवाहन करत आहोत असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले आहे. 18 जून रोजी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामध्ये दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली होती.