वृत्तसंस्था / ओटावा
‘कॅनडातील भारतीय दूतावास अधिकाऱ्यांची हत्या करा’, असे आवाहन करणारे पोस्टर्स आणि भित्तीपत्रके त्वरित काढून टाका असा आदेश कॅनडाच्या प्रशासनाने तेथील गुरुद्वारांच्या व्यवस्थापनांना दिला आहे. कॅनडाच्या सरे प्रांतातील गुरु नानक गुरुद्वाच्या भिंतींवर अशी धमकी देणारे पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यांच्यासंबंधी हा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.
खलिस्तानवादी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांची जूनमध्ये कॅनडात हत्या करण्यात आली होती. या हत्येत भारत सरकारच्या हस्तकांचा हात आहे, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे वादंग निर्माण झाले असून दोन्ही देशांमधील संबंध तणावग्रस्त झाले आहेत. दोन्ही देशांनी प्रत्येक एका दूतावास अधिकाऱ्याला देश सोडण्याचा आदेश दिला आहे. या तणावाचा गैरफायदा खलिस्तानवाद्यांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता कॅनडानेही सावधगिरीने पावले उचलावयास प्रारंभ केला आहे.
तीन अधिकाऱ्यांना धमकी
भारतीय दूतावासाच्या तीन ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे. निज्जर याच्या हत्येचा सूड उगविला जाईल. त्यासाठी या तीन अधिकाऱ्यांच्या हत्या करा, असा संदेश काही दहशतवादी संघटनांनी दिला आहे. आता कॅनडाचे प्रशासन सावध झाले असून दहशतवादावर नियंत्रणासाठी काही पावले टाकण्यास प्रारंभ झाला आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
पेंटागॉनच्या अधिकाऱ्याचा इशारा
अमेरिकेची संरक्षण संस्था पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी खलिस्तानवादी दहशतवादासंबंधी अमेरिकेलाही इशारा दिला आहे. निज्जर हा केवळ एक कर्मचारी होता असे समजले जाऊ नये. त्याचेही हात रक्ताने माखलेले आहेत. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला प्रोत्साहन कोणत्याही निमित्ताने दिले जाऊ नये, असे प्रतिपादन त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटोनी ब्लिंकन यांना उद्देशून केले. ब्लिंकन यांनी निज्जरच्या हत्येसंबंधात आंतरराष्ट्रीय दबावाचे कारण पुढे केले होते. दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाढेल अशी कृती कोणीही करुन नये अशी सूचना रुबिन यांनी एका मुलाखतीत केली.
संख्या कमी करा
कॅनडाच्या भारतातील दूतावासातील अधिकाऱ्यांची संख्या कमी करा, अशी सूचना भारताने कॅनडाला केली आहे. आपल्या दूतावासात अधिकारी जास्त आहेत. तुलनेने भारताच्या कॅनडातील दूतावासात अधिकारी कमी आहेत. त्यामुळे समतोल साधण्यासाठी कॅनडाने ही संख्या कमी करावी असे भारताचे म्हणणे आहे. निज्जर प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव हाताबाहेर जाऊ नये, याची दक्षता दोन्ही देशांनी घ्यावी, असे मत अन्य काही देशांनीही व्यक्त केले आहे.