मासिक बैठकीत दिली माहिती
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डने शाळेच्या आवारात टर्फ मैदान उभारले आहे. पुणे येथील बिटा स्पोर्ट्स क्लबशी बोर्डने करार केला असून दिवसा शाळेचे विद्यार्थी तर इतर वेळी त्या ठिकाणी खासगी प्रशिक्षण घेतले जाणार होते. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डने टर्फ मैदानाचा करार रद्द केला आहे. मंगळवारी झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मासिक बैठकीत हा निर्णय देण्यात आला. मागील दोन महिन्यांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डची बैठक झाली नव्हती. त्यामुळे बैठक केव्हा होणार, यासंदर्भात चर्चा सुरू होती. अखेर मंगळवार दि. 1 ऑगस्ट रोजी बोर्डची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये टर्फ मैदान, कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक, कर्मचाऱ्यांचा गणवेश याविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीला बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, सीईओ के. आनंद, आमदार राजू सेट, सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुपेकर व कॅन्टोन्मेंटचे अधिकारी उपस्थित होते. बिटा स्पोर्ट्स क्लबने काही महिन्यांपूर्वी टर्फ मैदान उभारले होते. यासंदर्भात आमदार राजू सेट यांनी प्रश्न उपस्थित केला असता बिटा स्पोर्ट्स क्लबशी झालेला करार रद्द करण्यात आल्याची माहिती या बैठकीदरम्यान देण्यात आली. याचबरोबर एलअँडटी कंपनीने जलवाहिनी घालण्यासाठी सुरक्षा ठेव म्हणून 54 लाख रुपये दिले आहेत. याचबरोबर जीओ कंपनीलाही केबल घालण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना गणवेश नाहीच
सुधीर तुपेकर यांनी कर्मचाऱ्यांना गणवेश शिलाईसाठी पैसे दिले जात नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रतिवर्षी कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी पैसे दिले जात असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यांना गणवेश दिले जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर कंत्राटी कर्मचारी भरती करताना पुन्हा त्याच त्याच कंपनीला कंत्राट दिले जात असल्याने याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.