ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबईमधील मुलुंड स्थित जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson and Johnson) या कंपनीवर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Department Of Maharashtra) मोठी कारवाई केली होती. उत्पादनाच्या पद्धतीत दोष आणि पावडरमध्ये (Baby Powder) काही धोकादायक पदार्थ आढळून आल्याने महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईमधील मुलुंड स्थित जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा परवाना रद्द केला होता. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले असून राज्य सरकारने प्रतिज्ञा पत्राद्वारे आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, या प्रकरणात जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson Company) कंपनीला कुठलाच दिलासा दिलेला नाही. कोर्टाने कंपनीचा परवाना रद्दचा निर्णय कायम ठेवला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जॉन्सन अॅंड जॉन्सन कंपनी भारतात आपल्या उत्पादनांची विक्री करत आहे. परंतु सदर नमुने सदोष आहेत. त्यामुळेच या कंपनीच्या उत्पादनचा परवाना रद्द करण्यात येत आहे असं सरकारच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या उत्पादनातील PH हा प्रमाणित मानकांनुसार नाही. ही पावडर वापरल्याने नवजात तसंच लहान मुलांच्या त्वचेला अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावडरचे उत्पादन सुरू ठेवणं हे योग्य होणार नाही, असं अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे.
दरम्यान, नवजात बालकांसाठी जॉन्सन अॅंड जॉन्सन बेबी पावडरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु या कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत दोष असल्यामुळं नवजात शिशू आणि लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. कंपनीचे उत्पादन अशाच प्रकारे सुरू राहिल्यास बालकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे मुंबई आणि मुलुंडमध्ये असणाऱ्या संस्थेच्या उत्पादनाचा परवाना आजच्या आदेशान्वये कायम स्वरूपी रद्द करण्यात आला होता. हे प्रकरण नंतर मुंबई उच्च न्यायलयात गेले. कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका मांडली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीला दिलासा न देता एफडीएचा निर्णय कायम ठेवला.