सध्याचे युग सोशल मिडियाचे आहे. ज्याला त्याला या माध्यमावर झळकायची मोठीच हौस असते. आपण आपला एखादा व्हिडीओ या मिडियावर पोस्ट केला, आणि त्याला भरपूर चाहते मिळाले तर आपला आर्थिक लाभसुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारे हे माध्यम प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही दृष्टींनी लाभदायक असल्याने असंख्य लोक त्याकडे आकर्षित झाले असल्यास नवल नाही. तथापि, अनेक लोक अशी प्रसिद्धी आणि पैसा मिळविण्यासाठी असत्याचा आधार घेतात, असेही दिसून आले आहे. कोणतीही सुविधा निर्माण झाली, की तिचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांचा एक वर्गही निर्माण होतो, ही बाब आपल्या नित्य अनुभवाची आहे.
अशाच प्रकारे एका ब्रिया नामक चीनी वेटलिफ्टर महिलेने आपली लोकप्रियता वाढविण्यासाठी स्वत:ला कर्करोग झाल्याचे नाटक केले. तिने तिचा बनाव खरा वाटेल अशा पोस्टही सोशल मिडियावर टाकल्या. तिच्यासाठी हळहळणाऱ्या लोकांनी त्या पहिल्या. लाखो लोकांनी त्या पाहिल्यामुळे तिला प्रसिद्धी आणि पैसेही मिळाले. तिचे हे चातुर्यपूर्ण नाटक तब्बल तीन वर्षे अखंड चालले होते.
मात्र तिच्याच माजी पतीने तिचा भांडाफोड केला. तिचा कर्करोग बनावट असून ती गेल्या तीन वर्षात कधीही डॉक्टरकडे गेलेली नाही. तसेच तिच्याजवळ कर्करोग झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. तिने तीन वर्षे लोकांना उल्लू बनविले आहे, असे त्याने स्पष्ट केल्याने तिचा पर्दाफाश झाला आहे. जे लोक तिच्यासाठी हळहळत होते तेच आता तिला शिव्याशाप देत असल्याचे दिसून येत आहे.