रुग्णाचा झाला मृत्यू
ओटवणे/ वार्ताहर-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अपुऱ्या आरोग्य यंत्रणेच्या सेवेचा फटका बुधवारी एका वृद्धाला बसला. जिल्ह्यात शासकिय कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने मुंबईहून मागवलेली कार्डियाक अॅम्ब्युलन्सने वृद्धाला उपचारासाठी सावंतवाडीहून मुंबई येथे नेत असतानाच माडखोल येथे चालत्या अॅम्ब्युलन्सचा टायर फुटला आणि या घटनेत वृद्धाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर असल्याचे सिद्ध झाले.
सावंतवाडी येथील (मूळचे कुणकेरी) लक्ष्मण विठ्ठल सावंत (वय 85) यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे न्यायचे ठरले. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची कार्डियाक अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने सावंत कुटुंबीयांना मुंबई हून ती मागवण्याची वेळ आली.
बुधवारी दुपारी या अॅमब्युलन्सने सावंत यांना मुंबई येथे नेत असताना माडखोल येथे एका तीव्र वळणार सदर अॅमब्युलन्सचा ड्रायव्हर बाजूचा मागचा टायर फुटला. सुदैवाने टायर फुटूनही गाडी काही अंतर पलटी न होता पुढे जाऊन थांबली आणि कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेत स्टेपनीसह फुटलेला टायर बदलण्यात बराच वेळ गेल्याने अॅमब्युलन्स मधील वृद्धाचा मृत्यू झाला.
अॅम्ब्युलन्स च्या ड्रायव्हरने गाडीच्या स्टेपनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु स्टेपनीसुद्धा खराब निघाल्याने सावंतवाडी येथे टायरची शोधाशोध केली गेली मात्र टायर उपलब्ध झाला नाही. दरम्यान या घटनेत माडखोल येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन केसरकर हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी स्वतःच्या गाडीचा टायर काढून अॅम्ब्युलन्सला दिला आणि गाडी मार्गस्थ केली.