‘आयटी’ मध्ये करियर
आज दहावी-बारावीमध्ये शिकणाऱ्या बऱ्याच युवक-युवतींना ‘पुढे काय करायचे आहे?’ असा प्रश्न विचारल्यावर ‘आयटी मध्ये करियर’ असे उत्तर मिळते. विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे-कोल्हापूर-सातारा-नागपूरमधले असोत वा भोर-मावळ-मंचर तालुक्यातील असोत, त्यांच्याबरोबर त्यांच्या पालकांचीही इच्छा सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याची असते. याचे प्रमुख कारण ‘लाखो रुपयांचे पॅकेज’ मिळण्याची आशा, हेच असते परंतु कोणीही खरे कारण सांगत नाही. “मला कॉम्प्युटरची लहानपणापासून आवड आहे”, ‘मला कोडींग-प्रोग्रामिंग फार आवडते”, “कॉम्प्युटरमधेच स्कोप आहे” अशी उत्तरे हमखास मिळतात.
कॉम्प्युटरची आवड म्हणजे काय? तासनतास
कॉम्प्युटरसमोर बसणे म्हणजे कॉम्प्युटरची आवड नव्हे. आपला मुलगा/मुलगी कॉम्प्युटरसमोर बसून नेमके काय करतो/करते याची सर्वसाधारण उत्सुकता पालकांनी दाखवायला हवी. पाच शाळेतल्या दोनशे विद्यार्थ्यांच्या दहावीच्या विषयवार मार्कांचा डेटा ‘एक्सेल’मध्ये भरल्यानंतर त्याचे काय विश्लेषण करता येईल, असा प्रश्न कोणत्याही शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीला विचारून बघा. हाती असलेल्या डेटावरून विश्लेषणात्मक काम स्वत:ला करता येणे, ही कॉम्प्युटर घरच्या घरी शिकण्याची दुसरी पायरी. कॉम्प्युटर शिकण्याची आवड असल्यास त्यासंबंधी डीमिस्टीफाइंग
कॉम्प्युटर, कॉम्प्युटर बेसिक कन्सेप्टस, डेटाबेस या विषयावरील किमान 300 पानांची तीन-चार पुस्तके विकत घेऊन सहा महिन्यात वाचून पूर्ण करणे ही कॉम्प्युटरची आवड असण्याची तिसरी पायरी. अशा विषयावरील इंग्रजी भाषेमधील पुस्तके वाचून न झाल्यास पालकांनी आपल्या पाल्याच्या कॉम्प्युटर इंजिनिअरींगवर खर्च करण्यापूर्वी पुन्हा विचार करावा. सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे ‘वर्ड’मध्ये एक-दोन पानांचा मजकूर इंग्रजीमध्ये टाइप करता येणे. त्यासाठी रोज अर्धा तास ‘वर्ड’मध्ये टायपिंग करण्याचा रियाज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पन्नास विद्यार्थ्यांचे गेल्या तीन वर्षातील मार्क एक्सेलमध्ये भरावेत आणि त्याचे विश्लेषण करावे. बेरीज, सरासरी याव्यतिरिक्त उत्तम दोन शाळा कोणत्या, सर्वात कोणत्या विषयामध्ये मार्क कमी पडले आहेत, मुले/मुली यांच्या मार्कांमध्ये काय तफावत आहे, मुलींना कोणत्या विषयामध्ये मुलांपेक्षा मार्क अधिक पडतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणे, त्याचे विश्लेषण असलेला रिपोर्ट ‘वर्ड’मध्ये तयार करणे, क्रिकेट स्कोअर एक्सेलमध्ये भरून दोन्ही संघांचा ग्राफ तयार करणे असे डेटा अॅनॅलीसीस ‘एक्सेल’मध्ये शिकता येते.
छोट्या मोठ्या गावातील-शहरातील बरेच पालक आपल्या पाल्यालाMS-CITकोर्सला पाठवतात. त्यासाठी 5,000 रुपये खर्च करणाऱ्या पालकांना असे वाटते की तिथे महिना-दोन महिना क्लासला गेल्यावर कॉम्प्युटर येतो. खरे तर हा
‘कॉम्प्युटर साक्षरता’ कोर्स आहे. या कोर्समध्ये शंभर टक्के उपस्थिती असली तरीही त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याच क्लासमध्ये कॉम्प्युटर हाताळण्याचा रोज एक तास सराव करणे अपेक्षित आहे, जे बरेच विद्यार्थी करत नाहीत. या कोर्समध्ये कॉम्प्युटरची तोंडओळख होण्यासाठी एक क्रमिक पुस्तक दिले जाते, त्याचे वाचन आवश्यक आहे. या दोन्ही बाबींकडे दुर्लक्ष करून बहुतांश बालक-पालक एक सर्टिफिकेट मिळवण्यात धन्यता मानतात. हा कोर्स केलेल्या विद्यार्थ्याना “तुला कॉम्प्युटर वापरण्यास दिला, तर त्यावर तुला काय काम करता येते?” असा प्रश्न विचारल्यास, बहुतांश विद्यार्थी, ‘मला ‘वर्ड’, एक्सेल, पॉवर पॉइंट, सगळेच येते’ असे खोटे उत्तर बिनधास्तपणे आणि अत्यंत आत्मविश्वासाने देतात. ‘वर्ड’ आणि ‘एक्सेल’च्या टूल बारवर बघितलेले पाच मेन्यू ऑप्शन आणि त्याचे उपयोग सांग, असे विचारल्यावर बहुतांश विद्यार्थ्यांची बोलती बंद होते. त्यामुळे एकूणच पालक आणि विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटरबद्दल साक्षर होणे गरजेचे आहे.
कॉम्प्युटर ऑपरेट करता येणे हे प्रत्येक विद्यार्थ्याने शिकून घ्यायलाच हवे. परंतु कॉम्प्युटर ऑपरेट करणे आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणे या भिन्न बाबी आहेत. बँक-इन्शुरन्स कंपन्या, विविध सरकारी-खाजगी कार्यालयांमध्ये जे कर्मचारी-अधिकारी काम करताना दिसतात, ते कॉम्प्युटर ऑपरेट करतात. त्यासाठी इंजिनिअर होण्याची आवश्यकता नसते. प्रत्येक कार्यालयामध्ये एक कॉम्प्युटर सिस्टीम वापरली जाते त्याचे प्रोग्रामिंग विविध आयटी कंपन्यांमध्ये केले जाते. त्यामध्ये नवीन काही सोयी-सुधारणा करावयाच्या असल्यास किंवा त्या सिस्टीम बंद पडल्या, मंदगतीने चालू लागल्या तर त्यावर उपाय योजना (म्हणजे सुधारित सॉफ्टवेअर देण्याचे काम) आयटी कंपन्या करतात. त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयटी इंडस्ट्री कशी चालते, तिथे काम करणारे कर्मचारी नेमके काय काम करतात हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आय.टी. इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यापूर्वी ज्यांनी आय.टी. इंडस्ट्रीमध्ये पाच, दहा आणि पंधरा वर्षे काम केले आहे अशा विविध कंपन्यातील कर्मचाऱ्यांना भेटून त्यांच्या रोजच्या कामाचे स्वरूप जाणून घेण्याविषयी प्रश्न विचारावेत. आउट सोर्स करणारी कंपनी कोणती, कॅप्टिव्ह कंपनी कोणती, परदेशातून कोणती कामे भारतात आउटसोर्स केली जातात, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींशी चर्चा करून नंतरच इंजिनिअर होण्याचे पाऊल उचलावे.
आय.टी. इंडस्ट्रीमध्ये बँक, इन्शुरन्स कंपनी,
हॉस्पिटलसारख्या विविध डोमेनकरीता (कार्यक्षेत्र) सॉफ्टवेअर तयार केली जातात, त्यामध्ये सुधारणा केल्या जातात, त्याची देखभाल केली जाते. प्रत्येक प्रोजेक्टचे विविध टप्पे असतात. डेव्हलपमेंट, टेस्टिंग, परफॉर्मन्स टेस्टिंग, गो लाइव्ह आणि त्यानंतर सपोर्ट/सुधारणा अशा टप्प्यावर काम करावे लागते. अनेक युवक डेव्हलपर होण्याची स्वप्ने बघतात परंतु आता सर्वांना सर्वच प्रकारची कामे करता यावीत अशी अपेक्षा असते. त्यामुळे विशेषत: पहिल्या पाच वर्षामध्ये ‘होईन तर डेव्हलपर’ असा बाणा असू नये. टेस्टिंग करण्याचे काम डेव्हलपरसह प्रत्येकाला करावे लागते.
सॉफ्टवेअरच्या लाईफ-सायकलमध्ये मिळेल त्या स्टेजवर काम करावे आणि शिकण्याची मनोवृत्ती कायम ठेवावी.
बी.एससी. (आय.टी), बी.एससी.
(कॉम्प्युटर सिस्टीम), बी.सी.ए., बी.बी.ए
(कॉम्प्युटर अॅप्लीकेशन) अशा विविध नावाने काही पदवी अभ्यासक्रम काही महाविद्यालयात सुरु आहेत. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यापूर्वी या महाविद्यालयामध्ये कोणत्या कंपन्यांनी किती जणांना कॅम्पस रिक्रूटमेंटमधून नोकरी दिली याची माहिती आवश्य घ्यावी. त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये कोणकोणत्या कंपन्यांनी या महाविद्यालयातील किती जणांना नोकऱ्या दिल्या त्याची चौकशी करावी. बऱ्याच नामवंत आय.टी कंपन्या (तशी आवश्यकता नसतानाही) फक्त इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश परीक्षेची संधी देतात. त्यामुळे बी.एससी., बी.सी.ए. अशा पदवीधारकांना कोणत्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो, याची माहिती प्रवेश फी भरण्यापूर्वी घ्यावी. या पदवीधारकांची गरज बँक-इन्शुरन्स कंपन्यांमध्येही असते परंतु बी.एससी. (आय.टी) करणारे स्वत:ला इंजिनिअर समजू लागतात आणि त्यामुळे त्यांना नोकरीशिवाय काही वर्षे घालवावी लागतात.
पहिल्या महिन्याचा पगार किमान पन्नास हजार असावा अशी युवक-युवतींची अपेक्षा असते. प्रत्येक नव-पदवीधराचे प्राधान्य पगारापेक्षा अनुभव मिळवण्याला असावे, त्यासाठीच छोट्या-मोठ्या स्टार्ट-अप कंपनीमध्ये मिळेल त्या पगारावर अनुभव घेण्यास सुरुवात करावी. मोठ्या कंपनीमध्ये पहिली नोकरी करण्यापेक्षा स्टार्ट अपमध्ये जुजबी पगारावर सर्वांगीण कामाचा अनुभव घेणे केव्हाही फायद्याचे आहे. अनेक युवकांना परदेशात नोकरी मिळवण्याची आस असते. अनेक आयटी कंपन्या आता कर्मचाऱ्यांना परदेशात पाठवत नाहीत. अमेरिका-युरोपच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात कर्मचारी मिळतात म्हणून इथल्या फ्रेशरना मागणी आहे. आपला गैरसमज असतो की आपल्याकडे टॅलंटचा महापूर आला आहे. तो गैरसमज काढून टाकण्यासाठी भारतात तयार केलेली कोणती
सॉफ्टवेअर जगभरात वापरली जातात, त्याची यादी करावी. तंत्रज्ञान दर सहा महिन्यांनी बदलते आहे. त्यामुळे निरंतर शिक्षण ट्रेनिंग घेत राहणे आवश्यक आहे. तशी इच्छा नसल्यास ‘आयटी’मध्ये करियर करण्याच्या वाटेला न जाणे श्रेयस्कर.
सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सर्वजण ‘कोडींग’ करत नसतात. आता नियमितपणे केली जाणारी कामे
ऑटोमेशनमुळे कमीतकमी वेळेत केली जातात. त्यामुळे पायथॉन ( (Python)जीरा (Jira) सारखी अनेक टूल्स शिकून घ्यावी लागतात. आज मागणी असणारे टूल सहा महिन्यांनी मागे पडलेले असते. डेटा अॅनॅलीसीस आणि आर्टीफिशियल इंटेलिजन्स यामध्ये विशेष शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. मिळालेल्या पदवीवर समाधानी न राहता दर सहा महिन्यांनी वेगवेगळे कोर्स करणे आणि त्याचा विनियोग करणे आवश्यक आहे. पाच वर्षांनी कोणते तंत्रज्ञान असणार आहे याची हमी आज कोणी देऊ शकत नाही. म्हणूनच आय.टी.ची वाट निवडण्यापूर्वी त्या क्षेत्राचा अभ्यास आवश्यक आहे.
सुहास किर्लोस्कर