प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या सर्वत्र डोळे येण्याची, डोळे लाल होण्याची किंवा सुजण्याची लाट आली आहे. याबाबत कोणती काळजी घ्यावी, याची कारणे काय? हे स्पष्ट करणारा हा लेख.
डोळा हा अत्यंत नाजूक अवयव आहे. म्हणूनच त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या डोळ्यातील पांढऱ्या रंगाचा जो भाग असतो (शुभ्रपटल) त्याला संसर्गदोष झाल्याने डोळे लाल होणे, खाज येणे, सुजणे, दाह होणे अशी लक्षणे सुरू होतात. अॅडिनो विषाणूमुळे हा त्रास उद्भवतो. बहुधा उन्हाळा संपता संपता किंवा पावसाळा सुरू होताना हा त्रास होतो.
►एका किंवा दोन्ही डोळ्यांत लालसरपणा दिसणे.
►डोळे दुखावणे, खाजविणे किंवा आग होणे.
►कोरोनाचा संसर्ग असल्यास अंधूक आणि पुसट दिसू लागते.
हा संसर्गजन्य आजार असून अत्यंत वेगाने पसरतो. म्हणूनच देशात सर्वत्र तो पसरू लागला आहे. ज्या व्यक्तीचे डोळे आले आहेत, त्या व्यक्तीने डोळ्याला हात लावला, तोच हात एखाद्या वस्तूला लावला व दुसऱ्या व्यक्तीने नकळत त्याच वस्तूला हात लावला व तोच हात डोळ्याला लावला तर बाधा होते.
►एखाद्याचे डोळे आले असतील आणि आपण त्याच्याकडे पाहिले तर संसर्ग होत नाही.
►आपण स्वत: संसर्गाला कारणीभूत असतो. त्यामुळे काळजी घेतल्यास आपण या संसर्गाला रोखू शकतो.
►यासाठी साबण व पाण्याने हात नेहमी स्वच्छ धुवावेत.
►डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे.
►ज्या व्यक्तीचे डोळे आले आहेत, त्याच्या वस्तू वापरू नयेत.
►संपर्कातील व्यक्तीचे घरात किंवा कामाच्या जागी डोळे आले असल्यास-
त्या व्यक्तीच्या जवळ बसू नये.
►त्या व्यक्तीने वापरलेली उशी, टॉवेल, रुमाल वापरू नये.
डोळे आले असल्यास-
►त्याच्यापासून शक्य तेवढे दूर राहावे
►नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा
►डोळ्यात घालण्यासाठी थेंब वा मलम नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावे
►संसर्ग गंभीर असल्यास अँटीव्हायरस किंवा वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात, त्या घ्याव्यात.
►शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
सुरक्षिततेसाठी हे लक्षात ठेवा-
►नेत्रतज्ञांनीच सांगितलेले औषध घ्या. या व्यतिरिक्त कोणतेही औषध किंवा ड्रॉप्स परस्पर विकत घेऊ नका.
►कोरोनाचा संसर्ग असल्यास त्यावरील उपाय फक्त नेत्रतज्ञच करू शकतात.
डॉ. कोडकणी सुपर स्पेशालिटी आय सेंटर येथे ‘रेडआय क्लिनिक’ हा विभाग वेगळा केला असल्याने बाकीचे रुग्ण अशा रुग्णांच्या संपर्कात येत नाहीत.
डॉ. शिल्पा कोडकणी (प्रमुख नेत्रतज्ञ व वैद्यकीय अधिकारी, डॉ. कोडकणी सुपर स्पेशालिटी आय सेंटर)
शब्दांकन- आशा रतनजी