वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी चौकशीसाठी पाचारण केले आहे. दिल्ली मद्य उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाचा तपास सुरू असून यासंदर्भात सीबीआयकडून त्यांची चौकशी होऊ शकते. सिसोदिया यांनीच ट्विटद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांवर आरोपही केले आहेत. माझ्याविरोधात सीबीआय, ईडीची संपूर्ण शक्ती वापरली जात आहे. घरावर छापा टाकला, बँकेच्या लॉकरची झडती घेतली. मात्र, माझ्याविरुद्ध काहीही सापडले नाही. आतापर्यंत तपासात मी नेहमीच सहकार्य केले असून यापुढेही करत राहीन, असे सिसोदिया यांनी स्पष्ट केले आहे. मी दिल्लीतील मुलांसाठी चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केली असून माझे हे कार्य रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही सिसोदिया यांनी केला आहे.