सचिवालयातील कार्यालयात तपासणी ः सोशल मीडिया संदेशाद्वारे स्वतःच दिली माहिती
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर सीबीआयने शनिवारी धाड टाकली. खुद्द मनिष सिसोदिया यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. या छापेमारीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, तपास यंत्रणेने छाप्याचे वृत्त फेटाळले असून आपले अधिकारी काही कागदपत्र आणण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते, असे स्पष्टीकरण दिले आहे.
मनिष सिसोदिया यांनी शनिवारी सायंकाळी आपल्या कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केल्याची माहिती दिली. आज पुन्हा एकदा सीबीआयचे अधिकारी माझ्या कार्यालयात आले आहेत. मी त्यांचे स्वागत करतो. त्यांनी माझ्या घरावर छापेमारी केली. कार्यालयातही छापेमारी केली. माझ्या लॉकरची तपासणी करण्यात आली. मात्र माझ्याविरोधात त्यांना अद्याप काहीही सापडलेले नाही. भविष्यातही काही आढळणार नाही. कारण मी काहीही चुकीचे केलेले नाही. मी प्रामाणिकपणे दिल्लीतील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून काम करत आलो आहे, असे मनिष सिसोदिया यांनी सोशल मीडिया संदेशाद्वारे सांगितले.
यापूर्वी ऑगस्ट 2022 मध्ये मनिष सिसोदिया यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापेमारी केली होती. दिल्लीमधील मद्य धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या अन्य नेत्यांनी भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मनिष सिसोदिया यांना लवकरच अटक केली जाणार आहे, असा दावाही त्यावेळी आप पक्षाने केला होता. मात्र, आतापर्यंत त्यांना अटक झालेली नाही. मद्य धोरणातील अफरातफरप्रकरणी सध्या तपास यंत्रणांकडून युद्धपातळीवर तपास सुरू आहे.