अंतर्गत फर्निचर-सजावट-फरशी कामे शिल्लक, लवकरच प्रवाशांच्या सेवेत
बेळगाव : प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सीबीटी बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. स्मार्टसिटी अंतर्गत या बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. मात्र, कोरोना आणि इतर कारणांमुळे मागील पाच वर्षांपासून काम रेंगाळले होते. मात्र, आता काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्मार्टसिटीच्या तब्बल 31 कोटींच्या निधीतून सुसज्ज बसस्थानक उभारण्यात येत आहे. विशेषत: लांब पल्ल्यासाठी आणि स्थानिक प्रवाशांसाठी स्वतंत्र बसस्थानक व्हावे, या दृष्टिकोनातून हे बसस्थानक उभारले जात आहे. या ठिकाणी बेळगाव शहर आण ग्रामीण भागातील बससाठी फलाट उभारला जाणार आहे. शिवाय मध्यवर्ती बसस्थानक आणि सीबीटी बसस्थानक जोडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना एका बसस्थानकातून दुसऱ्या बसस्थानकात ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे.
बसस्थानकातील 32 गुंठे जागा कँटोन्मेंट हद्दीत असल्याने मध्यंतरी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही काळ काम देखील थांबले होते. त्यानंतर तोडगा निघाला आहे. त्यामुळे कामाला देखील जोर आला आहे. बसस्थानकाचे काम तुमकूर येथील एका कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, कामगारांचा अभाव आणि इतर कारणांमुळे विलंब झाला आहे. बांधकाम पूर्ण झाले असले तरी अंतर्गत फर्निचर, सजावट, फरशी, इलेक्ट्रिक आणि इतर कामे देखील शिल्लक आहेत. येत्या काही काळात ही अंतर्गत कामे पर्ण झाल्यानंतर बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या बहुमजली बसस्थानकात कार्यालये, यात्री निवास, शौचालय आणि इतर खोल्यांची व्यवस्था केली आहे. विशेषत: हजारो गाड्या पार्क होतील, अशा पद्धतीचे पार्किंग तळमजल्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्नदेखील मार्गी लागणार आहे. दुचाकी, चारचाकी यासह इतर वाहनांना देखील पार्किंग उपलब्ध होणार आहे.
काम शेवटच्या टप्प्यात- के. के. लमाणी (डीटीओ, परिवहन)
मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता सीबीटी बसस्थानकाचे काम देखील शेवटच्या टप्प्यात आहे. काम पूर्ण होताच बसस्थानक प्रवाशांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे बसेस आणि प्रवाशांची गर्दीदेखील कमी होणार आहे.