वार्ताहर /किणये
किणये गावातील जागृत महालक्ष्मीदेवी मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. यानिमित्त विविध धार्मिक व आध्यत्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी पहाटे मंदिरात टाळ-मृदंगाच्या गजरात काकड आरती झाली. त्यानंतर गावातील सर्व देवदेवतांची पूजा-अर्चा करण्यात आली. सर्व मंदिरांजवळ व गावभर कलश मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या.
महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा-अर्चा विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर देवीची ओटी भरण्यात आली. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भाविकांनी देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
किणयेसह पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री दौंड (पुणे) येथील हभप अर्चनाताई साळुंखे यांचे कीर्तन निरुपण झाले. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी अनेक अभंग सादर केले. तसेच दैनंदिन नामस्मरणाचे महत्त्व कीर्तनाद्वारे पटवून दिले. कीर्तनात परिसरातील टाळकऱयांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला होता. कीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.