China App Digital Strike: केंद्र सरकारने पुन्हा एकदा चीनी अॅपवर कारवाई केली आहे. सरकराने 200 पेक्षा अधिक चायनिज अॅपवर बंदीचा निर्णय घेतला आहे. चिनी अॅप्सच्या मदतीने बेकायदेशीररीत्या कर्ज, सट्टेबाजी आणि जुगाराचा व्यवसाय़ चालविला जात होता. यामुळे भारत सरकारने कठोर पावले उचलत चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’ केला आहे. यामुळे चीनला मोठा झटका बसला आहे. तेलंगणा,ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थांनी या अॅप्सवर बंदी आणण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली आहे.
भारत हा चीनसाठी मोठी बाजारपेठ आहे. चीन नेहमीच काही ना काही कुरघोड्या करत असतो. गृहमंत्रालयाने सहा महिन्यांपूर्वी 288 चिनी लोन अॅप्सवर देखरेख सुरू केली होती. यापैकी 94 अॅप गुगलच्या अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत आणि इतर थर्ड पार्टी लिंकद्वारे काम करत आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला गृह मंत्रालयाने हे अॅप्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे अॅप्स ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार 200 पेक्षा जास्त चीनी अॅप्सवर बंदी आणली आहे. या अॅप्समध्ये 138 बेटिंग अॅप्स आणि 94 लोन अॅप्सचा समावेश आहे.
चीनी अॅप्स कसे कर्ज देतात
चीनी अॅप्स कोणत्याही कागदपत्रांशिवाय आणि केवायसीशिवाय कर्ज देतात
त्यामुळे लोकांना या अॅप्सवरून कर्ज घेणे सोपे वाटते
लोन अॅप युजर्सची वैयक्तिक माहिती जमा करतात
त्यानंतर ते ब्लॅकमेलिंग सुरु करतात
कर्जबाजारीपणा आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेक लोक आत्महत्याही करतात
भारत सरकारने अशा अॅपवर बंदी घातली आहे