हॉटेलसह गृहिणींच्या बजेटवर परिणाम
बेळगाव : वीजबिल, कडधान्य, डाळींच्या पाठोपाठ आता टोमॅटोच्या दरातदेखील भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करणे कठीण होऊ लागले आहे. एरव्ही 15 ते 20 रुपये किलो मिळणाऱ्या टोमॅटोने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ‘टोमॅटो नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ आली आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोचा दर वाढू लागला आहे. 20 रुपये किलो मिळणाऱ्या टोमॅटोने पंधरा दिवसांत शंभरी गाठली. याचबरोबर इतर भाजीपाल्यांचे दरदेखील वाढू लागले आहेत. वाढत्या महागाईमुळे जनता अधिक कचाट्यात सापडली आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंबरोबरच टोमॅटोचा दरदेखील वाढू लागल्याने जनता हैराण झाली आहे. डाळी, कडधान्य, भाजीपाला आणि टोमॅटोच्या दरात भरमसाट वाढ झाल्याने काहीजण अंड्यांना पसंती देऊ लागले आहेत. अंड्यांचा दर आवाक्यात असल्याने मागणीदेखील वाढली आहे. वाढत्या टोमॅटो दरामुळे आहारात पर्याय म्हणून चिंचेचा वापर केला जात आहे. वळीव आणि मान्सून पावसाने ओढ दिल्याने नवीन टोमॅटो उत्पादनदेखील थांबले आहे. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात मोठ्या आकाराचे टोमॅटो 100 रुपये किलो तर लहान आकाराचे 80 रुपये किलो दराने विक्री होत आहे. टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाल्याने दरात वाढ झाल्याचे विक्रेते सांगत आहेत. मात्र टोमॅटोचा वाढता दर गृहिणींची चिंता वाढविणारा ठरू लागला आहे.