उद्योग-व्यापारावर परिणाम होत असल्याची तक्रार
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखीची ठरत आहे. त्याचा परिणाम उद्योग व व्यापार क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात होत असून शहरातील वाहतूक कोंडी व बॅरिकेड्स संदर्भात ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे शुक्रवारी पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांनी पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. आपण वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत योग्य त्या उपाययोजना राबवू, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. यावेळी अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, सेक्रेटरी स्वप्नील शहा, ट्रेडिंग कमिटी चेअरमन संजय पोतदार, संचालक सी. सी. होंडदकट्टी, सतीश कुलकर्णी, सुधीर चौगुले, रोहित कपाडिया, शरद पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.