घोटाळाप्रकरणी 10 तास कसून चौकशी
वृत्तसंस्था / विजयवाडा
तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना रविवारी विजयवाडा येथील स्थानिक न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कोट्यावधी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या कथित घोटाळ्याप्रकरणी नंदियाल येथे शनिवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली होती. कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यातील कथित सहभागाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अटकेच्या कारवाईनंतर सीआयडी कार्यालयात पोहोचल्यानंतर नायडू यांची मध्यस्थांच्या उपस्थितीत गुह्यांमधील त्यांच्या भूमिकेबद्दल 10 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली.
कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्यात अटक केलेले तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ‘आरोपी 37’ असे नाव दिले आहे. न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालानुसार, सीआयडीने नायडू हे चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचे सांगितले. तसेच काही गोष्टी आठवत नसल्याचे सांगत अस्पष्ट उत्तरे दिल्यामुळे त्यांना रविवारी न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी करण्यात आली.
नायडू यांना एका कथित भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर रविवारी कडेकोट बंदोबस्तात लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो न्यायालयात हजर करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना नंदयाल येथून विजयवाडा येथे नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती. मात्र, हेलिकॉप्टर वापरण्यास त्यांनी नकार दिला. चौकशीदरम्यान नोट फाईल्सच्या आधारे अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यानंतर त्यांनी तपास अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही. चौकशीदरम्यान कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घेण्यासाठी, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी आणि जेवण आणि अल्पोपहार घेण्याच्या विनंतीनुसार त्यांना चौकशीतून अल्पकालीन विश्र्रांती देण्यात आली होती.