माजी मुख्यमंत्र्यांना मिळाला नाही दिलासा
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच तेदेप प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांची न्यायालयीन कोठडी एसीबी न्यायालयाने दोन दिवसांनी वाढविली आहे. चंद्राबाबू नायडू यांना कथित 371 कोटी रुपयांच्या राज्य कौशल विकास महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यापूर्वी नायडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
चंद्राबाबू हे मुख्यमंत्री असताना 2014-19 दरम्यान आंध्रप्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळात घोटाळा झाल्याच आरोप आहे. कथित स्वरुपात 371 कोटी रुपयांच्या या घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.
राज्य कौशल्य विकास महामंडळाची स्थापना 2016 मध्ये करण्यात आली होती. बेरोजगार युवांना कौशल्य प्रशिक्षण प्रदान करत त्यांना सशक्त करण्यासाठी ही योजना आणली गेली होती. या योजनेच्या अंमलबजावणीत 3,300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याप्रकरणी राज्य सीआयडीने मार्च महिन्यात चौकशी सुरू केली होती. यापूर्वी आयआरटीएसचे माजी अधिकारी अरजा श्रीकांत यांना नोटीस बजावण्यात आली होती. अरजा श्रीकांत हे 2016 मध्ये राज्य कौशल्य विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
योजनेच्या अंर्तत युकंना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सिमेन्स कंपनीला सोपविण्यात आली होती. या योजनेसाठी एकूण 3,300 कोटी रुपये खर्च केले जाणार होते, तर राज्य सरकार यातील 370 कोटी रुपयांचा खर्च उचलणार होते. उर्वरित 90 टक्के रक्कम सिमेन्स कंपनीकडून गुंतविण्यात येणार होती. परंतु सिमेन्स कंपनीकडून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला नव्हता. तरीही राज्य सरकारकडून 371 कोटी रुपये कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यात आले हेते.