भारतासाठी रशियाकडून मून लँडर स्थगित
वृत्तसंस्था /बेंगळूर
भारताचे अंतराळयान चंद्रावर उतरण्यास सज्ज आहे. इस्रो 3 जुलै रोजी चांद्रयान-3 प्रक्षेपित करणार आहे. भारताची मोहीम पाहता रशियाने मून लँडर मोहीम स्थगित केली आहे. चांद्रयान-3 ला चंद्रावर उतरण्याची संधी मिळावी म्हणून रशियाने हा निर्णय घेतला आहे. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण यशस्वी ठरल्यास भारत अशाप्रकारचे यश मिळविणारा चौथा देश ठरणार आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने स्वत:चे यान चंद्रावर उतरविण्यास यश मिळविले आहे. चांद्रयान-2 मोहीम 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित करण्यात आली होती. सुमारे 2 महिन्यांनी 7 सप्टेंबर 2019 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर उतरण्याचा प्रयत्न करणारा विक्रम लँडर दुर्घटनाग्रस्त झाला होता, तेव्हापासून भारत चांद्रयान-3 मोहिमेची तयारी करत आहे. चांद्रयान-2 मोहिमेत आम्ही अयशस्वी ठरलो होतो. प्रत्येकवेळी यशस्वी व्हायलाच हवे हे आवश्यक नाही, परंतु आम्ही या अपयशातून शिकलो आणि वाटचाल करू लागलो ही मोठी गोष्ट आहे. अपयशाचा अर्थ आम्ही प्रयत्न करणेच सोडून द्यावे असा होत नाही. चांद्रयान-3 मोहिमेकडून आम्हाला बरेच काही शिकायला मिळेल आणि आम्ही इतिहास रचू असे उद्गार इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी काढले आहेत. चांद्रयान मोहिमेच्या अंतर्गत इस्रो स्वत:चे यान चंद्रावर पाठविणार आहे. चंद्रासंबंधी संशोधन करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.