हिंदी प्राध्यापक संघाची आरसीयुकडे मागणी
बेळगाव : चालू शैक्षणिक वर्षाकरिता बीए प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी डीएससी म्हणजेच प्रमुख विषयांच्या ग्रुपमध्ये हिंदी, समाजशास्त्र या विषयांचा समावेश केला आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाने हे दोन्ही विषय एकाच ग्रुपमध्ये ठेवल्याने हिंदी, समाजशास्त्र विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे या विषयांचा ग्रुप बदलावा, अशी मागणी हिंदी प्राध्यापक संघातर्फे आरसीयुच्या रजिस्ट्रारना केली. हिंदी प्राध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. विजयकुमार पाटील यांनी आरसीयुच्या रजिस्ट्रार राजश्री जैनापुरेंना सोमवारी निवेदन देवून चर्चा केली. यावेळी त्यांनी हिंदी,समाजशास्त्र विषय वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्याचा विचार करू, असे सांगितले. निवेदनावर डॉ. राजेंद्र पोवार, डॉ. अजित कोळी, डॉ. डी. एम. मुल्ला, प्रा. जयश्री अंची, प्रा. निता पाटील, डॉ. अमित कोळी या हिंदी प्राध्यापकांच्या सह्या आहेत.