विना पॅन-आधार व्यवहारांची मर्यादा निश्चित ः नियमाचे उल्लंघन करणारे येणार अडचणीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
करदाते आणि मोठी आर्थिक देवाणघेवाण करणाऱयांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 26 मेपासून देवाणघेवाणीशी निगडित प्राप्तिकर नियमात मोठा बदल केला जाणार आहे. एका वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा अधिक बँकिंग देवाणघेवाणीसाठी पॅन आणि आधार अनिवार्य करण्यात आले आहे.
एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करणे किंवा काढून घेण्यासाठी ग्राहकांना अनिवार्य स्वरुपात पॅन आणि आधार कार्ड सादर करावे लागणार असल्याचे सीबीडीटीच्या अधिसूचनेत नमूद आहे. सीबीडीटीने प्राप्तिकर (15 वी दुरुस्ती) नियम, 2022 अंतर्गत नवे नियम तयार केले आहेत. यासंबंधीची अधिसूचना 10 मे रोजी जारी झाली होती.
पारदर्शकता वाढणार
या निर्णयामुळे करचोरी रोखण्यास मदत होणार असल्याचे तज्ञांचे मानणे आहे. देवाणघेवाणीवरून हा नियम अत्यंत पारदर्शकता वाढविणार आहे. तसेच आता बँका, पोस्ट ऑफिसना 20 लाखांहून अधिक रकमेच्या देवाणघेवाणीची माहिती द्यावी लागणार आहे. याचबरोबर आता कुठल्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते (करंट अकौंट) किंवा कॅश क्रेडिट खाते उघडण्यासाठी ग्राहकाला स्वतःच्या पॅन तसेच ‘आधार’ची माहिती द्यावी लागणार आहे.
पॅन नसल्यास…
प्राप्तिकर विभागाशी संबंधित विषयांमध्ये सध्या सर्व ठिकाणी पॅनचा वापर होतो. टॅक्स पोर्टलवर स्वतःचे पॅनकार्ड अपडेट करणे प्रत्येक करदात्यासाठी अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु 26 मेपासून लागू होणाऱया नियमामध्ये ग्राहकांना काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. एखादा करदाता 20 लाखाहून अधिक रकमेच्या देवाणघेवाणीत स्वतःचे पॅनकार्ड सादर करू न शकल्यास तो आधारकार्ड दाखवून व्यवहार पूर्ण करू शकतो.
करचोरी रोखण्यासाठी नियम
हे पाऊल करचोरी रोखण्यासाठी उचलण्यात येत आहे. बँकेत व्यवहारावेळी एखाद्याकडे पॅनकार्ड नसल्यास तो आधारची बायोमॅट्रिक ओळख सादर करू शकतो असे सीबीडीटीने म्हटले आहे. मोठय़ा देवाणघेवाणीत पॅनचा तपशील देण्यात आल्यावर करचोरीवर आळा घालणे सोपे ठरणार आहे. तसेच यामुळे सरकारच्या महसुलातही वृद्धी होणार आहे.
या व्यवहारांकरता नियम लागू होणार
-एका आर्थिक वर्षात कुठलीही बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक किंवा एकाहून अधिक खात्यांमधून 20 लाख रुपये रोख काढल्यावर.
-बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट अकौंट उघडल्यावर.
-करंट अकौंट उघडण्यासाठी आता प्रत्येकाला पॅन कार्ड सादर करावे लागेल.