राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे 25 ऑक्टोबरपासून सुट्टी
पणजी : राज्यातील विद्यालयांच्या दिवाळी सुट्टीत बदल करण्यात आला असून आता ती बुधवार दि. 25 ऑक्टोबर ते शनिवार दि. 19 नोव्हेंबर या कालावधीत देण्यात आली आहे. यापूर्वी सदर सुट्टी 7 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर अशी जाहीर करण्यात आली होती. गोव्यात 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने हा बदल करावा लागल्याचे शिक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी या संदर्भात परिपत्रक काढले असून त्यात हा सुट्टीतील बदलाचा आदेश जारी केला आहे. सर्व शाळांना ते परिपत्रक पाठवण्यात आले आहे. क्रीडास्पर्धांची तयारी वेगाने चालू असून त्याचाच एक भाग म्हणून सुट्टीत बदल केले असल्याचे सांगण्यात आले. 20 नोव्हेंबरपासून शाळा पूर्ववत सुरू होणार आहेत. दिवाळीची सुट्टी याच चालू ऑक्टोबर महिन्यात लागू होणार असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी 19 ते 20 दिवसांची दिवाळीची सुट्टी मिळत होती. यंदा मात्र त्यात 6 ते 7 दिवसांनी वाढ झाली असून तब्बल 26 दिवस सुट्टी लाभणार आहे. शिक्षक व शाळकरी मुलांना हा एक प्रकारे दिवाळीच्या वाढीव सुट्टीचा बोनसच मिळाला आहे. येत्या 25 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू होणार असून त्या 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. या कालावधीत क्रीडा स्पर्धांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हा बदल करण्यात आल्याचे क्रीडा खात्यातर्फे सांगण्यात आले.