महिला खासदारांची एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, केसही ओढले; राज्यपालांच्या अटकेवरून वाद
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियाच्या संसदेत मंगळवारी महिला खासदारांमध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याने जोरदार गोंधळ माजला. या गोंधळादरम्यान महिलांनी एकमेकांचे केस ओढल्याचेही व्हिडीओ फुटेजमध्ये दिसून येत आहे. विरोधी खासदार बॅनर लावून घोषणाबाजी करत असताना सत्ताधारी पक्षाचे खासदार त्यांच्याशी भिडल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. सांताक्रूझ प्रदेशाचे राज्यपाल आणि संसदेतील विरोधी पक्षनेते लुईस फर्नाडो पॅमाचो यांच्या अटकेवरून हा वाद उफाळल्याचे सांगण्यात आले.
सत्ताधारी पक्षाचे मंत्री एडुआर्डो डेल पॅस्टिलो गव्हर्नरच्या अटकेचा अहवाल सादर करत असताना विरोधी पक्षनेत्यांनी घोषणाबाजी सुरू केली. याप्रसंगी विरोधी पक्षनेत्यांनी मंत्री पॅस्टिलो यांची छायाचित्रे असलेले बॅनरही लावले. त्यावर कॅस्टिलो यांना ‘दहशतवादी मंत्री’ असे संबोधण्यात आले होते. दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी बॅनर फाडण्यास सुऊवात केल्याने पंधरा ते वीस खासदार आमने-सामने आले. मंत्री एडुआर्डो डेल पॅस्टिलो यांनी सांताक्रूझ प्रदेशाचे राज्यपाल आणि संसदेतील विरोधी पक्षनेते लुईस फर्नाडो पॅमाचो यांच्या अटकेला कायदेशीर म्हटले आहे. विरोधी खासदारांनी गोंधळ घालण्यास सुऊवात केली तेव्हा डेल पॅस्टिलो यांनी त्यांना कट्टरपंथी, हिंसक म्हटले. यानंतर वाद वाढत गेला.
देशाच्या संसदेत गदारोळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2 डिसेंबर 2022 रोजी सेनेगलच्या संसदेत एका खासदाराने महिला खासदाराला थप्पड मारली होती. यानंतर संतापलेल्या महिला मंत्र्याने त्यांच्यावर खुर्ची फेकल्यानंतर दोन्ही खासदारांमध्ये हाणामारी झाली होती.