वृत्तसंस्था /अहमदाबाद
अखेरच्या चेंडूतपर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या शेवटच्या दोन चेंडूवरील षटकार आणि चौकाराच्या आतषबाजीने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सचा डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 5 गड्यांनी पराभव करत आयपीएल चषकावर आपले पाचव्यांदा मोहोर उमटवली. पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी चेन्नई सुपर किंग्जला 15 षटकात 171 धावांचे नवे उद्दिष्ट दिले होते. दरम्यान चेन्नईने 15 षटकात 5 बाद 171 धावा जमवित गुजरातला सलग दुसऱ्या अजिंक्यपदापासून रोखले. 2023 च्या टाटा आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात साई सुदर्शन आणि वृद्धिमन साहा यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान आणि विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 215 धावांचे कडवे आव्हान दिले. सुदर्शनचे शतक 4 धावांनी हुकले.
गुजरातचा डाव संपल्यानंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाल्याने सुमारे दीड तास खेळ थांबवावा लागला. पंचांनी रात्री 11.30 वाजता मैदान आणि खेळपट्टीची पाहणी करुन खेळ सुरु करण्याचा आदेश दिला पण त्यांनी चेन्नईला डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 15 षटकात विजयासाठी 171 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. गायकवाड आणि कॉनवे यांनी सलामीच्या गड्यासाठी 39 चेंडूत 74 धावांची भागिदारी केली. नूर अहमदने गायकवाडला रशिद खानकरवी झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26 धावा जमविल्या. त्यानंतर नूर अहमदने आपल्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर कॉनवेचा बळी मिळविला. कॉनवेने 25 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 47 धावा जमविल्या. पॉवरप्ले दरम्यान चेन्नईने 4 षटकात 52 धावा जमविल्या होत्या. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या गड्यासाठी 39 धावांची भागिदारी केली. दरम्यान मोहित शर्माने अजिंक्य रहाणेला झेलबाद केले. त्याने 13 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या. मोहित शर्माने आपल्या दुसऱ्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चेन्नईच्या अंबाती रायडू आणि कर्णधार धोनी यांना बाद केल्याने चेन्नईवर पुन्हा दडपण आले. रायडूने 8 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. धोनी पहिल्या चेंडूवर खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला.
चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती. हे षटक टाकण्याची जबाबदारी मोहित शर्मावर सोपविण्यात आली होती. त्याने या षटकातील पहिल्या चार चेंडूवर केवळ 3 धावा दिल्या होत्या. त्यामुळे गुजरातचे पारडे थोडे जड वाटत होते. पण अष्टपैलू जडेजाने या षटकातील पाचव्या चेंडूवर उत्तुंग षटकार तर शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून गुजरातचे आव्हान संपुष्टात आणले. दुबेने 21 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 32 तर जडेजाने 6 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 15 धावा जमविल्या. गुजरात टायटन्सतर्फे मोहित शर्माने 36 धावात 3 तर नूर अहमदने 17 धावात 2 गडी बाद केले. चेन्नईच्या डावात 10 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. या स्पर्धेतील हा अंतिम सामना रविवारी पावसामुळे एक दिवस उशिरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे शौकिनांची निराशी झाली होती. पण सोमवारी पावसाने पूर्ण दडी मारल्याने शौकिनांना पुन्हा गुजरातच्या फलंदाजांनी फटकेबाजीने बेहद खुश केले. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी दिली.
साहा आणि गिल या सलामीच्या जोडीने 42 चेंडूत 67 धावांची भागिदारी केली. या जोडीने अर्धशतकी भागिदारी 42 चेंडूत नोंदविली. तर गुजरातने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 62 धावा जमविल्या. डावातील 7 व्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर गिल पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात यष्टीरक्षक धोनी करवी यष्टीचीत झाला. त्याने 20 चेंडूत 7 चौकारांसह 39 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या साई सुदर्शनने सुरुवातीपासूनच षटकार आणि चौकारांवर अधिक भर दिला. त्याला साहाची चांगली साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 7 षटकात 64 धावांची भागिदारी केली. गुजरातचे शतक 67 चेंडूत फलकावर लागले. तर साहाने 36 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. 14 व्या षटकात दीपक चहरने सलामीच्या साहाला धोनीकरवी झेलबाद केले. त्याने 39 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 54 धावा झोडपल्या.
कर्णधार हार्दिक पांड्या आणि साई सुदर्शन या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 5.3 षटकात 81 धावांची भर घातली. साई सुदर्शनने आपले अर्धशतक 33 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. गुजरातचे दीडशतक 94 चेंडूत फलकावर लागले. सुदर्शन आणि पांड्या यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केवळ 23 चेंडूत नोंदविली. गुजरातच्या 200 धावा 114 चेंडूत फलकावर लागल्या. डावातील शेवटच्या षटकामध्ये चेन्नईच्या पथिरनाने तिसऱ्या आणि शेवटच्या चेंडूवर साई सुदर्शन आणि रशिद खान यांना बाद केले. साई सुदर्शन उत्तुंग फटका मारण्याच्या नादात पायचीत झाला. त्याने 47 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांसह 96 धावा झळकविल्या. कर्णधार पांड्या 12 चेंडूत 2 षटकारांसह 21 धावांवर नाबाद राहिला. रशिद खानला मात्र आपले खाते उघडता आले नाही. गुजरातच्या डावात 9 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. गुजरात टायटन्सने पहिल्या 1 ते 6 षटकांमध्ये 62 धावा, 7 ते 15 षटकांमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा तर 16 ते 20 या षटकामध्ये त्यांनी 2 गड्यांच्या मोबदल्यात 71 धावा जमविल्या. गुजरातला अवांतराच्या रुपात 4 धावा मिळाल्या. चेन्नईतर्फे पथिरनाने 44 धावात 2 तर दीपक चहर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स : 20 षटकात 4 बाद 214 (साहा 39 चेंडूत 1 षटकार 5 चौकारांसह 54, गिल 20 चेंडूत 7 चौकारांसह 39, साई सुदर्शन 47 चेंडूत 6 षटकार 8 चौकारांसह 96, हार्दिक पांड्या 12 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 21, रशिद खान 0, अवांतर 4, पथिरना 2-44, दीपक चहर 1-38, रवींद्र जडेजा 1-38).
चेन्नई सुपर किंग्ज : (विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे उद्दिष्ट), 15 षटकात 5 बाद 171 (गायकवाड 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26, कॉनवे 25 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 47, शिवम दुबे 21 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 32, रहाणे 13 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 27, रायडू 8 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 19, धोनी 0, जडेजा 6 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 15, अवांतर 5, मोहित शर्मा 3-30, नूर अहमद 2-17).
हंगामात तब्बल इतक्या धावा शुबमन गिलच ऑरेंज कॅपचा मानकरी
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या आयपीएलमधील अंतिम सामन्यात गुजरात वि. चेन्नई आमने-सामने होते. या सामन्यात शुबमन गिल हा वेगाने धावा करत होता. मात्र, चपळाईसाठी ओळखला जाणारा एमएस धोनी गिलसाठी धोका ठरला. धोनीने गिलला मैदानावर जास्त वेळ टिकूच दिले नाही. गिल बाद झाला असला, तरीही त्याने या हंगामात खास विक्रम नावावर केले. मात्र, तो विराट कोहली याचा विक्रम मोडण्यात अपयशी ठरला. अंतिम सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी गुजरातकडून शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी गिल आणि साहा दोघेही चांगल्या लयीत धावा कुटत होते. मात्र, पॉवरप्ले संपताच सातव्या षटकात गिलला आपली विकेट गमवावी लागली. यावेळी गिलने 20 चेंडूत 39 धावा केल्या. या धावा करताना त्याने 7 चौकार मारले. यासह त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवले गेले. त्यातील पहिला विक्रम म्हणजे सर्वाधिक धावांचा.
हंगामातील सर्वाधिक धावा शुबमन गिल
आयपीएल 2023 हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने 17 सामने खेळताना सर्वाधिक 890 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 शतकेही झळकावली. तसेच,4 अर्धशतकांचाही पाऊस पाडला. 129 ही त्याची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे.
आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा 30 हून अधिक धावा
एका आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा 30 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये गिलने अव्वल क्रमांक पटकावला. त्याने यंदाच्या हंगामात 13 वेळा 30 हून अधिक धावा केल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानी विराट कोहली असून त्याने 2016 मध्ये 12 वेळा 30 हून अधिक धावा केल्या होत्या. तसेच, विराटसोबत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी असलेल्या केन विलियम्सननेही 2018 मध्ये 12 वेळा 30 हून अधिक धावा केल्या होत्या.
हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज
शुबमन गिल अंतिम सामन्यात 39 धावांची खेळी साकारत हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याच्या 890 धावा झाल्या आहेत. तो एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला. या यादीत अव्वलस्थानी विराट कोहली असून त्याने 2016 मध्ये सर्वाधिक 973 धावा केल्या होत्या.