रॉयल लंडन वनडे कपः ससेक्सतर्फे अवघ्या 90 चेंडूत 132 धावांची आतषबाजी
होव्ह-युनायटेड किंगडम / वृत्तसंस्था
भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत ससेक्सतर्फे खेळताना मिडलसेक्सविरुद्ध तिसरे शतक झळकावले. पुजाराने अवघ्या 90 चेंडूत 20 चौकार, 2 षटकारांसह 132 धावांची आतषबाजी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 146.66 इतका राहिला. यंदा पुजारा या कौंटी हंगामात लक्षवेधी फॉर्ममध्ये राहिला आहे.
टॉम अल्सॉप (नाबाद 189) व पुजारा (132) यांच्या फटकेबाजीमुळे ससेक्स संघाने मिडलसेक्सविरुद्ध 50 षटकात तब्बल 4 बाद 400 धावांचा डोंगर रचला. अल्सॉप व पुजारा यांनी तिसऱया गडय़ासाठी 240 धावांची भागीदारी साकारली. मिडलसेक्सतर्फे मॅक्स हॅरिसने 56 धावात 3 बळी घेतले.
विजयासाठी 401 धावांचा पाठलाग करत असताना मिडलसेक्सतर्फे यष्टीरक्षक-फलंदाज जो क्रॅकनेलने सर्वाधिक 71 तर मार्टिन अँडरसनने 30 धावांचे योगदान दिले. मात्र, हेन्री क्रोकोम्बे (3-33) व डेलरे रॉलिन्स (3-61) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना सर्वबाद 243 धावांवर समाधान मानावे लागले.
पुजाराने आतापर्यंत 8 डावात 102.33 च्या सरासरीने 614 धावांची आतषबाजी केली असून यात 3 शतके व 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने सरेविरुद्ध 174 धावा फटकावल्या व हीच त्याची या हंगामातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. ससेक्सच्या एखाद्या खेळाडूचा लिस्ट ए क्रिकेटमधील देखील हा सर्वोच्च विक्रम आहे.
पुजाराने याशिवाय कौंटी चॅम्पियनशिप डीव्हिजन-2 मध्ये 8 सामन्यातील 13 डावात 109.40 च्या सरासरीने 1094 धावांचे योगदान दिले. यात 231 ही त्याची सर्वोत्तम खेळी साकारली. त्याने या चॅम्पियनशिपमध्ये 5 शतके झळकावली.
लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (पहिले 5 फलंदाज)
फलंदाज / देश / धावा
ग्रॅहम गूच / इंग्लंड / 22211
ग्रॅहम हिक / इंग्लंड / 22059
सचिन तेंडुलकर / भारत / 21999
कुमार संगकारा / श्रीलंका / 19456
व्हीवियन रिचर्ड्स / विंडीज / 16995
बॉक्स
विराट-बाबर आझमला मागे टाकले
कसोटी स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱया चेतेश्वर पुजाराने रॉयल लंडन वनडे चषक स्पर्धेत शतक झळकावत असताना याचवेळी लिस्ट ए क्रिकेटमध्ये आपली सरासरी देखील 57 वर पोहोचवली. 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळत ही दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे. या निकषावर त्याने विराट कोहली व बाबर आझमला आता पिछाडीवर टाकले आहे.
100 व त्याहून अधिक डाव खेळल्यानंतर सरासरी
फलंदाज / देश / सरासरी / डाव
मायकल बेव्हन / ऑस्ट्रेलिया / 57.86 / 385
चेतेश्वर पुजारा / भारत / 57.48 / 109
बाबर आझम / पाकिस्तान / 56.56 / 153
विराट कोहली / भारत / 56.50 / 286
खुर्रम मंजूर / पाकिस्तान / 53.52 / 166
बॉक्स
काय असते लिस्ट ए क्रिकेट?
40 ते 60 षटकांमध्ये खेळवल्या जाणाऱया मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकाराला लिस्ट ए क्रिकेट म्हणून ओळखले जाते. याचवेळी डावात षटकांची मर्यादा नसलेल्या कसोटी क्रिकेटचा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये समावेश होतो. लिस्ट ए क्रिकेटमध्ये स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचाही विचार केला जातो.