वैयक्तिक ड्रेसेजमध्ये छेडा, अनुश, दिव्याकृती अंतिम फेरीत
वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी प्रगती केली तर काही खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. मंगळवारी सांघिक ड्रेसेजमध्ये भारतीय घोडेस्वारांनी सुवर्णयश मिळविले होते. बुधवारी वैयक्तिक डेसेजमध्येही हृदय विपुल छेडा, अनुश अगरवाला, दिव्याकृती सिंग यांनी अंतिम फेरी गाठत पदकाची संधी निर्माण केली आहे.
पात्रता फेरीत छेडाने 73.883 गुण घेत अव्वल स्थान मिळविले तर अनुशने 71.706 गुण घेत चौथे स्थान मिळविले. दिव्याकृती सिंगने 67.676 गुण घेत 11 वे स्थान मिळविले तर सुदिप्ती हजेला पात्रता फेरीतूनच बाहेर पडली. अव्वल 15 घोडेस्वारांना अंतिम फेरीत स्थान दिले जाते
स्क्वॉशमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी दुसरा विजय नोंदवला. पुरुष संघाने कुवैतचा 3-0 असा पराभव केला. महेश माणगावकर, सौरव घोषाल, अभय सिंग यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले. महिलांमध्ये भारताने नेपाळचा 3-0 असा पराभव केला. दीपिका पल्लिकल, जोश्ना चिनप्पा, अनाहत सिंग यांनी विजय मिळविले.
3×3 बास्केटबॉलमध्ये भारताच्या पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठताना मकावचा 21-12 असा विजय मिळविला. त्याआधी भारताने मलेशियाचा 20-16 असा पराभव केला होता.
सायकलिंगमध्ये भारताच्या डेव्हिड बेकहॅमने स्प्रिंट प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठली. डेव्हिडने कझाकच्या सर्जी पोनोमॅरोवह व आंद्रेय काझचुगे यांचा रिपेचेज फेरीत पराभव करून उपांत्यपूर्व फेरी निश्चित केली. रोनाल्डो सिंग मात्र पहिल्याच फेरीत पराभूत झाला. महिलांच्या कायरन सायकलिंगमध्ये सुशिकला आगाशेने पाचवे स्थान मिळाल्याने ती उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही.
बुद्धिबळमध्ये भारतीय खेळाडूंना वैयक्तिक प्रकारात पदक मिळविता आले नाही. विदित गुजराथीला शेवटच्या फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने त्याला पदकापासून वंचित रहावे लागले. गुजराथी व अर्जुन इरिगेसी यांनी प्रत्येकी 5.5 गुण घेत पाचवे व सहावे स्थान मिळविले. महिलांमध्ये कोनेरू हंपी सातवी आली. चीनच्या खेळाडूने पुरुषांचे सुवर्ण मिळविले तर महिलांमध्ये जिनर झुने जेतेपद मिळविले.
टेनिसमध्ये एकेरीत भारतीय खेळाडूंना रिक्त हस्ते परतावे लागले. मात्र दुहेरीत रामकुमार रामनाथन व साकेत मायनेनी यांनी उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले आहे. फेन्सिंगमध्ये महिलांना उपांत्यपूर्व फेरीत तर पुरुषांना उपउपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडावे लागले. जलतरणमध्ये श्रीहरी नटराजने 200 मे. फ्रीस्टाईलमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला प्राथमिक फेरीत त्याने 1:49.05 से. वेळ नोंदवली. त्याला एकंदरमध्ये दहावे स्थान मिळाल्याने अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरू शकला नाही.