ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तरी देखील त्याच्या जन्मदिनी चेंबूरमधील शिष्याने केक कापून जाहीरपणे त्याचा वाढदिवस साजरा केला. निलेश पराडकर असं राजनचा वाढदिवस साजरा करणाऱ्या शिष्याचे नाव असून, तो शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा नवी मुंबई संपर्कप्रमुख आहे. रात्री उशिरा टिळकनगर पोलिसांनी त्याला अटक केली.
13 जानेवारी रोजी छोटा राजनचा वाढदिवस होता. निलेश पराडकर यांनी केक कापून छोटा राजन यांचा वाढदिवस साजरा केला. तसेच या वाढदिवसाचं निमित्त साधून मालाड पूर्वेकडील तानाजी नगर परिसरातील गणेश मैदानावर 14 आणि 15 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता कबड्डी स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. त्यासाठी मोठमोठे बॅनरही लावण्यात आले होते. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी बॅनर हटवले. तसेच बॅनरवर फोटो असलेल्या लोकांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
दरम्यान, निलेश पराडकर यांना आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने टिळकनगर पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, पासपोर्ट जमा करणे, तसेच कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नये अशा अतिशर्थीवर 25 हजार रुपये जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.