चंदन, गवती चहाच्या शेतीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
प्रतिनिधी/ सातारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दरे (ता. महाबळेश्वर) दौऱयावर आहेत. त्यांनी सोमवारी महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिह्यातील ‘क’ वर्ग पर्यटन तसेच धार्मिक व यात्रा स्थळांच्या विकासकामांचा आढावा घेतला. मात्र मंगळवारी मुख्यमंत्री मायभूमीतील शेतकऱयांच्या बांधावर जावून शेतातील पिकांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी एका वर्षापूर्वी लागवड केलेल्या पिकांची पाहणी केली. मुख्यमंत्री अत्यंत साध्या वेशभूषेत सर्वांना पाहीला मिळाल्याने अनेकांना आर्श्चय वाटले.
मुख्यमंत्री शिंदे हे राजकारणात सक्रीय असले तरी त्यांना शेतीची आवड असल्याचे अनेकवेळा महाराष्ट्राला पाहीला मिळाले आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा दौऱयावर असलेले मुख्यमंत्री हे मंगळवारी सकाळी शेताच्या बांधावर गेले. यावेळी त्यांच्याबरोबर प्रशासनातील अधिकारी व गावकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेती कशा पध्दतीने करावी याचे मार्गदर्शन केले.
गेल्या वर्षी त्यांनी शेतात चंदनाची झाडे लावली असून ती झाडे आता एक वर्षाची झाली आहेत. यासह अंतर पीक म्हणून गवती चहा, आवळा, हळद अशा पिकांचीही लागवड केली आहे. एकाचवेळी एकापेक्षा जास्त पीक घेतल्याने शेतकऱयांना चांगले उत्पन्न मिळले असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यामुळे प्रत्येक शेतकऱयांने मुख्य पिकासह अंतर्गत पीक घेतले पाहिजे. यामुळे शेतकऱयांच्या खिशात चार पैसे जास्त मिळतील, असे आवाहन त्यांनी केले.
अंतर्गत शेती शेतकऱयांना फायदेशीर
मंगळवारी अचनाक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे परिसरातील शेतकऱयांच्या शेतीच्या बांधावर जावून अचानक भेट दिली आहे. यावेळी त्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱयांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, येथील शेतकऱयांनी चंदनाच्या शेतामध्ये गवती चहा, आवळ्याची व हळदीचे अंतर्गत पिक घेतले आहे. त्यामुळे शेतकऱयांना याचा नक्कीच फायदा होणार असून चार पैसे त्यांच्या खशीत पडणार आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी शेतामध्ये एकच पिक न घेता अंतर्गत पिकांची शेती करण्याचे आवाहन केले.