बेळगाव ; कर्नाटक राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या अपर्णा कोळ्ळ यांनी रविवारी बेळगाव जिल्ह्यातील विविध आस्थापनांना भेटी देऊन पाहणी केली. बेळगाव व चिकोडी येथे त्यांचा हा दौरा होता. चिकोडी येथील देवराज अर्स मागासवर्गीय मॅट्रिकपूर्व मुला-मुलींचे वसतिगृह, मॅट्रिकनंतरचे वसतिगृह, तालुका सार्वजनिक इस्पितळ, एनआरसी केंद्र, शिवाजीनगर बेळगाव येथील बालमंदिर, स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानच्या दत्तक स्वीकार केंद्र व वेगवेगळ्या अनाथाश्रमांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तसेच अपर्णा कोळ्ळ यांनी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन जिल्ह्यात बालहक्कांच्या संरक्षणाविषयी सुरू असलेल्या कामकाजाविषयी चर्चा केली. जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. मुरळी मोहन रे•ाr, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.
शाळा खोल्यांची डागडुजी
बालविवाह, बालकामगार प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले, की, जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे शिथिल झालेल्या अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले होते. यापैकी 4 कोटी रुपयातून दोनशे अंगणवाडी केंद्रे व 4 कोटी रुपयातून शाळाखोल्यांची डागडुजी करण्यात आली आहे. यावेळी महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज ए. एम., जिल्हा बालसंरक्षणाधिकारी महांतेश बजंत्री, सचिन हिरेमठ, महेश संगानट्टी, श्रीदेवी गुळ्ळ आदी उपस्थित होते.